मुंबईत चार हजार मतदान केंद्रे वाढवली; एका ठिकाणच्या मतदारांची संख्या बाराशेवरून आठशेवर, गर्दी आणि दुबार मतदान टाळण्यासाठी पालिका सज्ज

मुंबईमध्ये मतदान केंद्रांवर होणारी गर्दी कमी करण्यासाठी आणि दुबार मतदानाला आळा घालण्यासाठी पालिकेने ठोस उपाययोजना करण्यास सुरुवात केली असून मतदान केंद्रांची संख्या सात हजारांवरून 11 हजार करण्यात आली आहे. तर एका केंद्रावरील मतदारांची संख्याही बाराशेवरून आठशेपर्यंत खाली आणण्यात आली आहे. शिवाय दुबार मतदारांच्या घरोघरी जाऊन तपासणी करण्याचे काम पालिकेच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी पालिकेच्या माध्यमातून आवश्यक उपाययोजना करण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये दुबार मतदारांच्या घरी जाऊन तपासणी करण्याचे निर्देश पालिका निवडणूक अधिकारी तथा आयुक्त भूषण गगराणी यांनी पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. तर आता राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदान सुरळीत पार पडण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून पालिकेला आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार पालिका गर्दी कमी करण्यासाठी उपाययोजना करीत आहे.
मतदार याद्यांवर 3567 हरकती आणि सूचना
मुंबई महापालिकेने जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीवर आतापर्यंत तब्बल 3567 हरकती आणि सूचना नोंदवण्यात आल्या आहेत. यामध्ये दुबार नावे, चुकीची नावे, प्रभाग बदलला, पह्टो चुकीचा आणि नाव-पत्ता चुकीचा असल्याच्या तक्रारी मतदारांकडून करण्यात आल्या आहेत. हरकती व सूचना नोंदवण्याची मुदत 3 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.
मोबाईलबाबत पालिकेने व्यवस्था करावी
निवडणुकी दिवशी मतदान केंद्राच्या 100 मीटर भागात मोबाईल किंवा वाहन नेण्यास बंदीच राहणार आहे. यामध्ये दिव्यांगाना सूट मिळू शकते.
मोबाईलला पूर्ण बंदी असून मतदानासाठी गेल्यावर मोबाईल सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश आयोगाने पालिकेला दिले आहेत.

Comments are closed.