संसदेचे अधिवेशन गोंधळात सुरू होते

प्रथमदिनी घोषणायुद्ध, सभात्याग, कामात व्यत्यय

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

संसदेच्या शीतकालीन अधिवेशनाला गोंधळातच प्रारंभ झाला आहे. सोमवारी अधिवेशनाच्या प्रथम दिवशी बराच काळ घोषणायुद्ध पहावयास मिळाले आहे. विरोधकांनी सभात्याग केल्याने कामकाजात व्यत्यय आला. त्यामुळे लोकसभेचे कामकाज दोन वेळा स्थगित करावे लागले. केंद्र सरकार कोणत्याही विषयावर चर्चा करण्यास सज्ज आहे. विरोधकांनी चर्चा होऊ देण्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आले. तरीही गदारोळ अखंड होतच राहिला.

या देशातील लोक नाटकीपणाला नव्हे, तर कामगिरीला महत्व देशात, हे विरोधकांनी लक्षात घ्यावे, असे सूचक आणि खोचक विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिवेशनाच्या प्रारंभाआधी केले आहे. त्यामुळे विरोधक संतप्त झाल्याचे दिसून आले. नाटकबाज तर आपणच आहात, असे प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. शत्ताधाऱ्यांच्या नाटकीपणामुळे चर्चा होत नाहीत, अशी टिप्पणी प्रियांका गांधी यांनी केली.

‘वंदे मातरम्’वर चर्चा होणार

भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामाचा मंत्र ठरलेल्या ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगानाचे हे 150 वे वर्ष आहे. त्यामुळे या गीतावर विशेष चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही चर्चा या आठवड्याच्या अखेरीस होण्याची शक्यता असून ती 10 तास होईल, असे निर्धारित करण्यात आले आहे. ही चर्चा लोकभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये केली जाईल. या चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत.

राज्यसभेत खडाखडी

नवनियुक्त उपराष्ट्रपती आणि तामिळनाडूतील नेते सी. पी. राधाकृष्णन यांचे राज्यसभेचे अध्यक्ष या नात्याने हे प्रथम अधिवेशन आहे. या अधिवेशनाच्या सोमवारच्या प्रथमदिनी काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी शाब्दिक चकमक उडाली. ‘आपण भारतीय जनता पक्षाचे आहात, असे लोक बोलताना’ अशी खोचक टिप्पणी खर्गे यांनी केल्याने भारतीय जनता पक्षाचे सदस्य संतप्त झाले होते. खर्गे यांनी उपराष्ट्रपतीपदाचा उपमर्द होईल अशी भाषा करु नये. खर्गे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. त्यांनी अशी अवांछनीय भाषा करणे योग्य नाही, असा टोला केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनी लगावला. या शब्दाशब्दीचे पडसाद सभागृहात पुढचा काहीवेळ उमटत राहिल्याचे पहावयास मिळत होते.

तीन आर्थिक विधेयके सादर

शून्य प्रहरात लोकसभेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महत्वाची तीन आर्थिक विधेयके सादर केली आहेत. तंबाखू आणि तंबाखूचे पदार्थ तसेच पानमसाला या पदार्थांवर अतिरिक्त अधिभार (सेस) लावण्यासाठीच्या विधेयकाचा यात समावेश आहे. त्यांनी आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षेसंबंधी विधेयकही सादर केले. ही विधेयके याच अधिवेशनात संमत केली जाण्याची शक्यता आहे.

डॉक्टर दोनदा स्थिर वादळ

प्रश्नोत्तरांचा तास संपल्यानंतर विरोधकांनी दोन्ही सभागृहात प्रचंड घोषणाबाजी केली. केंद्रीय निवडणूक आयोगाने हाती घेतलेल्या ‘सखोल मतदारसूची सर्वेक्षणा’ला असणारा विरोध व्यक्त करण्यासाठी अनेकदा विरोधी सदस्यांनी सभाध्यक्षांच्या आसनाकडे धाव घेऊन कामकाजात व्यत्यय आणला. त्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज प्रत्येक दोनवेळा स्थगित करण्याची वेळ सभाध्यांच्यावर आल्याचे दिसले.

रेणुका चौधरी कुत्र्यासह परिसरात

काँग्रेसच्या लोकसभा सदस्या रेणुका चौधरी यांनी संसद परिसरात येताना आपला पाळीव कुत्राही समवेत आणला होता. त्यांची ही कृती चर्चेचा आणि टीकेला विषय बनली. संसद परिसराचे पावित्र्य प्रत्येक सदस्याने राखावयास हवे, अशी टिप्पणी भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी केली. आपला कुत्रा चावत नाही. चावणारे संसद सदनांमध्ये आहेत, अशी भाषा रेणुका चौधरी यांनी केली.

‘वंदे मातरम्, शब्द नव्हे, मंत्र

लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगानासंबंधी महत्वपूर्ण व्यक्तव्य केले आहे. ‘वंदे मातरम्’ हे केवळ शब्द नाहीत. तर तो एक महान मंत्र आहे. देशातील जनतेला देशाच्या इतिहासाशी जोडणारे हे गीत आहे. भारतातील प्रत्येकाचे ‘भारत माते’शी असणारे समर्पण आणि भक्ती यांचे द्योतक हे गीत आहे. या गीतामुळे भारताला वर्तमान काळात आत्मविश्वास आणि भविष्यकाळासाठी प्रेरणा मिळते, असे गौरवोद्गार त्यानी या गीतासंबंधी काढले.

पहिला दिवस…

ड संसदेच्या शीतकालीन अधिवेशनात प्रचंड गदारोळ, काम अनेकदा स्थगित

ड राष्ट्रीय मंत्र ‘वंदे मातरम्’वर संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये चर्चा आयोजित

ड ‘नाटकीपणा सोडा, कामगिरीला प्राधान्य द्या’ पंतप्रधान मोदी यांचा पलटवार

Comments are closed.