आयपीएललाही मुकण्याचे चिन्नास्वामीवर संकट; महिला वर्ल्ड कप, टी-20 वर्ल्ड कपपाठोपाठ आयपीएलमधूनही पत्ता कापण्याची शक्यता

कधी टाळ्यांचा कडकडाट, कधी षटकारांचा पाऊस आणि कधी प्रेक्षकांचा महासागर… बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमने अनेक ऐतिहासिक क्षण पाहिले आहेत. पण आता त्याच मैदानाभोवती प्रश्नचिन्हांचे गहिरे ढग दाटले आहेत. टी-20 वर्ल्ड कपपाठोपाठ त्यांचे 2026च्या आयपीएल सामन्यांचे आयोजनही धोक्यात आले आहे. कारण कर्नाटक सरकारने स्टेडियमच्या संरचनात्मक सुरक्षिततेचे सखोल आणि स्वतंत्र परीक्षण अहवाल अनिवार्य केले आहेत. या अहवालानंतरच चिन्नास्वामीचे भवितव्य अधिक स्पष्ट होईल. त्यामुळे आगामी आयपीएलचे सामने नवी मुंबईच्या डी.वाय. पाटीलवर खेळविण्याची पर्यायी व्यवस्था केली जाऊ शकते.
हे धक्कादायक पाऊल जून महिन्यात झालेल्या त्या काळजाला चिरणाऱया चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर उचलण्यात आले आहे. त्या एकाच दिवशी 11 जणांचे जीव गेले, सुमारे 50 जण जखमी झाले आणि त्या घटनेनंतर क्रिकेटच्या या मंदिरात जणू ‘शांतता’ पसरलीय.
कर्नाटकाच्या लोकनिर्माण विभागाने (पीडब्ल्यूडी) कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेला नोटीस बजावत स्पष्ट आदेश दिला आहे की, स्टेडियमची संपूर्ण संरचनात्मक तपासणी करून प्रमाणित तज्ञांकडून तयार केलेला अधिकृत सुरक्षा अहवाल सादर करण्यात यावा. 17 एकर पीडब्ल्यूडीच्या भाडेपट्टीच्या जागेवर उभ्या असलेल्या या भव्य स्टेडियमची प्रत्येक गॅलरी, प्रत्येक तटबंदी आणि प्रत्येक जिना सुरक्षित असल्याचे तांत्रिकदृष्टय़ा सिद्ध करावे लागणार आहे. ही स्वतंत्र तपासणी पूर्ण होईपर्यंत स्टेडियममध्ये कोणत्याही क्रिकेटला परवानगी दिली जाणार नसल्याच्या भूमिकेबाबत राज्य सरकार ठाम आहे. त्यामुळे क्रिकेटच्या या किल्ल्यावर सरकारने कुलूप ठोकलेय.
जूनमधील दुर्दैवी घटनेनंतर न्यायमूर्ती जॉन मायकेल डी’कुन्हा यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या स्वतंत्र समितीने चिन्नास्वामी स्टेडियमला मोठय़ा कार्यक्रमांसाठी ‘असुरक्षित’ ठरवले होते. या मैदानावर मोठय़ा कार्यक्रमांचे आयोजन म्हणजे गर्दी नियंत्रण आणि आपत्कालीन व्यवस्थापनाच्या दृष्टीने हा एक धोकादायक जुगार असल्याचे कठोर मत त्यांनी अहवालात नमूद केले होते. क्रिकेटच्या पिचवर यॉर्कर पडतातच पण येथे अहवालाने थेट व्यवस्थेच्या मुळावरच यॉर्कर टाकत त्यांना हादरवले. या अहवालाचा फटका केवळ आयपीएललाच बसलेला नाही. बीसीसीआयने बंगळुरूकडून महिला वनडे वर्ल्ड कप आणि पुरुष टी-20 वर्ल्ड कपचे सामनेही काढून घेतले आहेत.

Comments are closed.