छे! आता टेस्ट नव्हे वन डेच बेस्ट, कसोटी पुनरागमनाच्या चर्चांना विराटकडून पूर्णविराम

हिंदुस्थानचा माजी कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या कसोटी क्रिकेटमधील पुनरागमनाबाबत गेले काही आठवडे सुरू असलेल्या चर्चांना अखेर थेट आणि ठोस उत्तर मिळाले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रांची येथे झळकवलेल्या धडाकेबाज शतकानंतर विराटने स्पष्ट शब्दांत सांगितले की, आता त्याच्यासाठी टेस्ट नव्हे, वन डे क्रिकेटच बेस्ट फॉरमॅट आहे आणि केवळ त्याच्यावरच आपले लक्ष पेंद्रित करणार आहे. त्यामुळे तूर्तास कसोटी क्रिकेटमध्ये परतण्याचा कोणताही विचार नाही.

पहिल्या वनडे लढतीनंतर सामनावीराचा पुरस्कार स्वीकारताना समालोचक हर्षा भोगले यांनी विराटला कसोटी पुनरागमनाबाबत थेट प्रश्न विचारला. ‘तू सध्या एकाच फॉरमॅटमध्ये खेळत आहेस, पुढेही हेच कायम राहणार का?’ यावर विराट ठामपणे म्हणाला, ‘हो, पुढेही हेच कायम राहील. मी फक्त एकच फॉरमॅट खेळतोय.’

300हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळल्यानंतर माणूस स्वतःच्या शरीराची भाषा समजू लागतो. आपल्या शरीराची मर्यादा कळते. जिथे शरीर आणि मन पूर्ण तयार आहेत, तिथेच मी खेळणार. जोपर्यंत मी तंदुरुस्त आहे आणि उत्साह कायम आहे तोपर्यंत वनडे क्रिकेटचा आनंद घेत राहीन, असे सांगत विराट कोहलीने कसोटी निर्णयाबाबतीतली आपली भूमिका अधिक स्पष्ट केली.

चर्चांच्या बातम्या निव्वळ अफवा

दरम्यान, काही माध्यमांत बीसीसीआय विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना कसोटी निवृत्तीचा निर्णय बदलण्यासाठी चर्चा करत असल्याच्या बातम्या सुरू होत्या, विशेषतः हिंदुस्थानला सलग दोन कसोटीत दारुण पराभव पत्करावा लागल्याने या निर्णयाबाबत अधिक चर्चा होऊ लागली. मात्र या बातम्या फेटाळून लावत बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी सांगितले की, कोहलीबाबत सुरू असलेल्या चर्चा पूर्णपणे अफवा आहेत. आमच्याकडून त्यांच्याशी याबाबतीत अद्याप कोणताही संवाद झालेला नाही. त्यामुळे अशा निराधार आणि बिनबुडाच्या बातम्यांकडे दुर्लक्ष करावे.

Comments are closed.