IND vs SA : शुबमन गिलची फिटनेस चिंता वाढली; टी20 मालिकेत खेळणार का? मोठं अपडेट समोर
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वनडे मालिका संपताच 9 डिसेंबरपासून टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. पाच सामन्यांची ही मालिका आगामी टी20 वर्ल्डकप 2026 च्या दृष्टीने भारतीय संघ व्यवस्थापनासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. कारण वर्ल्डकपपूर्वी टीम इंडिया केवळ दोनच टी20 मालिका खेळणार आहे. जे की दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडविरुद्ध होईल. त्यामुळे या दोन्ही मालिकांमधील फॉर्मात असलेल्या खेळाडूंना वर्ल्डकप संघात स्थान मिळण्याची शक्यता जास्त मानली जात आहे. यामुळे प्रत्येक खेळाडू या संधीचं सोनं करण्यासाठी सज्ज आहे.
दरम्यान, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सूर्यकुमार यादवच्या अनुपस्थितीत उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आलेला शुबमन गिल सध्या दुखापतीमुळे मैदानाबाहेर आहे. दुखापतीच्या समस्येमुळे तो कसोटी आणि नंतरची वनडे मालिकेला मुकला. त्यामुळे आता तो टी20 मालिकेत पुनरागमन करणार का? हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. गिलच्या गैरहजेरीचा परिणाम पहिल्या कसोटीत दिसून आला होता, ज्याात भारताला 10 फलंदाजांसह उतरावे लागले आणि 30 धावांनी पराभव स्विकारावा लागला. त्यानंतर मालिकेचे गणितही बिघडत गेले आणि टीम इंडियाला 2-0 ने पराभव पत्करावा लागला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शुबमन गिल सध्या बीसीसीआयच्या बंगळुरुस्थित सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये रिहॅब घेत आहे. ज्यात त्याच्या काही महत्त्वाच्या चाचण्या सुरू असून त्या पूर्ण झाल्यानंतरच त्याची टी20 मालिकेसाठी उपलब्धता निश्चित केली जाणार आहे. क्रिकबझच्या माहितीनुसार, गिलच्या खेळण्याची शक्यता 50 टक्क्यांपेक्षा जास्त असली तरी तो पूर्णपणे फिट असेल असं दिसत नाही. त्यामुळे त्याचं मैदानात उतरलं जाणं आव्हानात्मक ठरू शकतं. दरम्यान, भारतीय संघाची टी20 मालिकेसाठी अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही आणि निवडकर्त्यांचे लक्ष गिलच्या फिटनेस रिपोर्टवर केंद्रीत आहे.
पीटीआयनुसार, गिलला दुखापत झाल्यानंतर इंजेक्शन दिलं असून त्याला 21 दिवसांच्या विश्रांतीचा आणि रिहॅबचा सल्ला देण्यात आला आहे. स्पोर्ट्स सायन्स टीम त्याची फिटनेस टेस्ट घेऊनच पुढील निर्णय घेणार आहे. फलंदाजीदरम्यान काही अस्वस्थता जाणवत नाही तोवर त्याच्या पुनरागमनाला हिरवा कंदील मिळणार नाही.
Comments are closed.