Karad Accident – सहलीहून परतताना नाशिकच्या विद्यार्थ्यांची बस उड्डाणपुलावरून कोसळली; 9 ते 10 विद्यार्थी गंभीर जखमी

पुणे-बंगळुरू महामार्गावर कराड तालुक्यातील वाठार गावच्या हद्दीत मंगळवार पहाटेच्या सुमारास नाशिकहून सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांची बस अपघातग्रस्त झाल्याची घटना घडली. या अपघातात नऊ ते दहा विद्यार्थ्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
प्राप्त माहितीनुसार, नाशिकमधील विद्यार्थ्यांची सहल कोकणात गेली होती. सहल संपवून आज पहाटेच ही बस कोकणातून नाशिककडे परतत होती. दरम्यान, वाठार तालुका कराड गावच्या हद्दीत रस्त्याचे काम सुरू असल्याने रस्ता अरुंद व असमतोल होता. कमी प्रकाशमान आणि काम सुरू असलेल्या भागाचा चालकाला नीट अंदाज न आल्याने बसचा तोल गेला आणि बस उड्डाणपुलावरून खाली खड्ड्यात कोसळली.
अपघातानंतर विद्यार्थ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले. काहीजण बसमध्ये अडकून पडले होते. घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी राजश्री पाटील, कराड तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्यासह पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांसह स्थानिक नागरिकांनी मदतकार्य सुरू करत जखमी विद्यार्थ्यांना बाहेर काढून तातडीने रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, अपघातस्थळी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. बस क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्याचे काम सुरू असून अधिकाऱ्यांनी अपघाताचे कारण म्हणून रस्त्याची दुरुस्ती, रात्रीचा अंधार आणि चालकाचा अंदाज न येणे ही प्राथमिक कारणे असल्याचे सांगितले.
या अपघाताची अधिक तपासनीस पोलिसांकडून सुरू असून सहलीसाठी आलेल्या इतर विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर होण्यासाठी उपचार सुरू आहेत.

Comments are closed.