देवेंद्र फडणवीस निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रचंड नाराजी, निकालाची तारीख पुढे जाताच म्हणाले…


नगर परिषद निवडणुकीचा निकाल पुढे ढकलला : राज्यातील सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी म्हणजे 21 डिसेंबरला जाहीर करण्यात यावेत, असे निर्देश मंगळवारी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. नियोजित वेळापत्रकानुसार नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी (Nagarpanchayat) आज मतदान पार पडत आहे. उद्या या सर्व ठिकाणी निकाल जाहीर होणार होते. परंतु, आरक्षण मर्यादेबाबतच्या निर्बंधांमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या 24 नगरपरिषदांच्या निवडणुकांमुळे आता उच्च न्यायालयाने सर्व निवडणुका पार पडल्यानंतरच एकत्रितपणे 21 डिसेंबरला निकाल जाहीर करावेत, असे निर्देश दिले. त्यामुळे उद्या सेलिब्रेशनच्या तयारीत असलेल्या सत्ताधारी महायुती आघाडीचा काहीसा भ्रमनिरास झाला आहे. याबाबत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नाराजी बोलून दाखवली.

गेल्या 25-30 वर्षांपासून मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहत आहे. पण पहिल्यांदाच पाहतोय की, घोषित केलेल्या निवडणुका पुढे जात आहेत. त्याचे निकाल पुढे जात आहेत. मला असं वाटतं की, एकूणच ही पद्धती फार योग्य नाही. पण उच्च न्यायलय खंडपीठ स्वायत्त आहे, त्यांचा निकाल सर्वांना  मान्य करावा लागेल. निवडणूक आयोग स्वायत्त आहे. जे उमेदवार आहेत मेहनत करतात, प्रचार करतात, त्यांचा भ्रमनिरास होतो, यंत्रणेच्या अपयशामुळे त्यांची काही चूक नसताना या गोष्टी होणे योग्य नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

निवडणूक आयोगाला राज्यात आणखी खूप निवडणुका घ्यायच्या आहेत. आता या सगळ्या प्रक्रियेत निवडणूक आयोगाने सुधार आणला  पाहिजे. किमान पुढच्या निवडणुकीत असं होणार नाही, हे बघितले पाहिजे.  या सगळ्याबाबत माझं मत असं आहे की, मी या सगळ्याला चूक म्हणणार नाही. पण  जो काही कायदा आहे चुकीचा अर्थ लावण्यात आला. निवडणूक आयोगाचे वकील कोण आहेत मला महिती नाही. पण त्यांचा संपूर्ण आदर ठेवून सांगतो की, त्यांनी कायद्याचा चुकीचा अर्थ काढला आहे. मी इतकी वर्षे निवडणुका मी बघतो आहे, लढवत आहे, मीदेखील नियम बघितले आहेत. मी अनेक वकिलांशी सल्लामसलत केली आहे. पण निवडणूक आयोगाकडून चुकीचा अर्थ लावण्यात आला. ज्याठिकाणी सगळ्या गोष्टी पालन झाले आहे, अशा ठिकाणी कोर्टात गेलं तर कोर्टाने त्याला दिलासाही दिला नाही. मात्र, केवळ कोर्टात गेला म्हणून त्याठिकाणी निवडणुका पुढे नेणं कुठल्याच तत्त्वाच बसत नाही. पण मी यावर अधिक बोलणार नाही. यासंदर्भात माझी वैयक्तिक नाराजी कालही प्रकट केली. ती कायद्यावर आधारित आहे, निवडणूक आयोगावर नाराजी नाही माझी कायदेशीर गोष्टींचे पालन होत नाही, याबाबत नाराजी आहे. 284 पैकी केवळ 24 ठिकाणी निवडणुका व्हायच्या आहेत म्हणून सगळी मतमोजणी पुढे करणं मला तरी योग्य वाटत नाही, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

आणखी वाचा

मोठी बातमी : उद्याची मतमोजणी रद्द, हायकोर्टाचा मोठा निर्णय, निकालाची नवी तारीखही जाहीर!

आणखी वाचा

Comments are closed.