मदतीच्या नावाखाली पाकिस्तानने श्रीलंकेच्या पूरग्रस्तांसाठी एक्सपायर सामान पाठवले, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

श्रीलंकेत दित्वा चक्रिवादळाने थैमान घातले असून तिथे भयंकर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. बंगालच्या सागरातून आलेल्या दित्वा चक्रिवादळाने श्रीलंकेत धुमाकूळ घातला आहे. जोरदार पाऊस आणि वादळाने श्रीलंकेत पूरस्थिती ओढावली आहे. अशावेळी पाकिस्तानने श्रीलंकेच्या मदतीसाठी पूरग्रस्तांसाठी काही सामान पाठवले आहे, मात्र ते एक्स्पायर झाले आहेत. ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून युजर्सकडून खिल्ली उडवली जात आहे.
श्रीलंकेतील पाकिस्तान हाय कमिशनने हे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले. पण त्यावेळी सर्वांची नजर एक्स्पायरी डेटवर पडली. त्यानंतर ही पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाल्यानंतर युजर्सकडून पाकिस्तानची खिल्ली उडवली जात आहे. पूरग्रस्तांना मदतीच्या सामान शेअर करताना पाकिस्तान कमिशनने लिहीले की, पाकिस्तानातून श्रीलंकेत पूर आल्याने मदतीचे सामान बंधूभगिनींसाठी पाठवले आहे. हे फोटो पाहताच युजर्सची नजर सामानाच्या एक्सायरी डेटवर पडली, जिथे ऑक्टोबर 2024 लिहीले होते.
या पोस्टवर प्रतिक्रिया देताना एका युजरने लिहीले की, कचऱ्याला डब्यात टाकण्याऐवजी पाकिस्तानने त्यांचे एक्सपायर झालेले सामान श्रीलंकेतील पूरग्रस्तांना पाठवले आहे. तर दुसऱ्याने लिहीले की, काही लाज बाकी आहे का? अशा अनेक पोस्ट आल्या आहेत. त्यानंतर पोस्ट व्हायरल झाल्यानंतर पाकिस्तान हाय कमीशनने ती पोस्ट डिलीट केली आहे. मात्र त्याचे फोटो इंटरनेटवर मात्र चांगलेच व्हायरल होत आहेत.

Comments are closed.