एलोन मस्कने महाविद्यालयीन तरुणांना दिलाय हा खास सल्ला, वाचा

झीरोधाचे सह-संस्थापक निखिल कामत यांच्या पॉडकास्टमध्ये जगप्रसिद्ध उद्योजक एलोन मस्क यांचा समावेश होता. ही चर्चा एक तासाहून अधिक काळ चालली, ज्यामध्ये मस्कने करिअर, अभ्यास, कौशल्ये आणि भविष्यातील शिक्षण याबद्दल स्पष्टपणे त्यांची मते व्यक्त केली. निखिल कामथ यांनी यावेळी मस्क यांनी विविध प्रकारचे प्रश्न विचारले. त्यातील सर्वात महत्त्वाचा आणि तरुणांना विचारात पाडणारा प्रश्न होता की, खरंच आजच्या घडीला काॅलेजमध्ये जाणे आवश्यक आहे का? या प्रश्नावर मस्क यांचे उत्तर अगदी स्पष्ट होते. ते म्हणाले, खरंतर काॅलेजमध्ये जाणे हे अगदी आवश्यक नाही. परंतु एलोन मस्क म्हणाले की, कॉलेज हे केवळ पदवी मिळविण्याचे ठिकाण नाही, तर जगाला चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा एक महत्त्वाचा मार्ग आहे. त्यांच्या मते, कॉलेज हा एक “अन्वेषण टप्पा” आहे जिथे विद्यार्थी त्यांच्या करिअर आणि जीवनाबद्दल खोलवर विचार करू शकतात.

मस्कच्या मते, कॉलेजचा सर्वात महत्वाचा पैलू म्हणजे संरचित शिक्षण. विद्यार्थ्यांना याठिकाणी विविध विषयांची ओळख होते. या गप्पांदरम्यान मस्क यांनी विद्यार्थ्यांना असा सल्ला दिला की, स्वतःला केवळ अभ्यासातील विषयांपुरते मर्यादित ठेवू नका. यावर त्यांनी उदाहरण देखील दिले. ते म्हणाले, विज्ञानाचा अभ्यास करत असाल तर त्यांनी मानवशास्त्राचा देखील अभ्यास केला पाहिजे. अर्थशास्त्राचा अभ्यास करत असाल तर त्यांनी मानसशास्त्राचा देखील अभ्यास केला पाहिजे.

एलोन मस्क म्हणाले की, महाविद्यालयाचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे त्यांना तिथे भेटणारे लोक. एकाच छताखाली महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना भविष्यातील सह-संस्थापक, संघचालक, मार्गदर्शक आणि विचारसरणी बदलणाऱ्या व्यक्तींचा सहवास लाभतो. त्यामुळे स्वतःचे नेटवर्किंग वाढवण्यासाठी या गोष्टी फार उपयुक्त ठरतात.

मस्कच्या मते, महाविद्यालय हे केवळ अभ्यासाचे ठिकाण नाही, तर विद्यार्थ्यांसाठी परिपक्व होण्याचे ठिकाण आहे. टीमवर्क, संवाद, वाटाघाटी आणि अपयश हाताळणे या गोष्टी महाविद्यालयात शिकायला मिळतात. मस्क असेही म्हणाले की, भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता आपोआप अनेक ठिकाणी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे नुसत्या पदवीपुरते शिक्षण हे कुचकामी ठरेल.

भविष्यात सर्वात जास्त आवश्यक असलेल्या कौशल्यांमध्ये गंभीर विचारसरणी, समस्या अचूकपणे समजून घेणे, सर्जनशीलता, उपाय शोधण्यासाठी वेगवेगळ्या विषयांचे संयोजन आणि संघ आणि नेतृत्व कौशल्ये यांचा समावेश आहे.

Comments are closed.