पोलिसाच्या ताब्यातील बोगस मतदाराला पळवून लावण्यात मदत, संजय गायकवाडांच्या मुलावर गुन्हा


बुलढाणा : बुलढाणा येथील शिवसेना आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांचा मुलगा कुणाल गायकवाड (Kunal Gaikwad) आणि नातेवाईक श्रीकांंत गायकवाड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. स्थानिक नागरिकांनी पकडलेल्या बोगस मतदाराला (Bogus Voter) पोलिसांच्या तावडीतून पळवून लावण्यास मदत केल्या प्रकरणी कुणाल गायकवाड आणि श्रीकांत गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती बुलढाण्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी दिली आहे.

Kunal Gaikwad : कुणाल गायकवाडवर गुन्हा दाखल

बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र असलेल्या कुणाल गायकवाड व नातेवाईक असलेला श्रीकांत गायकवाड यांच्यावर बुलढाणा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. बोगस मतदाराला पोलिसांच्या ताब्यातून पळवून लावण्यास कुणाल गायकवाड मदत करत असल्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला होता. यामुळं या प्रकरणाची राज्यभर चर्चा सुरु झाली होती. अखेर कुणाल गायकवाड आणि  श्रीकांत गायकवाड या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आज सकाळी शासकीय तांत्रिक संस्था येथील मतदान केंद्रावरून पोलीस अंमलदाराच्या ताब्यातून एका बोगस मतदाराला पळवून नेण्यास मदत करणे व शासकीय कामात अडथळा आणणे या कारणासाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुणाल गायकवाड आणि श्रीकांत गायकवाड या दोघांवर कलम 132, 49, 351 – 2-3-5 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळं बुलढाण्यात राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

आज सकाळी बुलढाण्यातील शासकीय तांत्रिक संस्थेत असलेल्या मतदान केंद्रावर काही कार्यकर्त्यांनी एका बोगस मतदाराला पकडून चोप दिला. त्याचवेळी त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं. मात्र, तात्काळ संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड आपल्या सहकाऱ्यांसह त्या ठिकाणी पोहोचले आणि त्या मतदाराला पळवून लावण्यास मदत केली.  शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी बुलढाणा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी दिली आहे.

बुलढाणा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवी राठोड यांनी याबाबत बोलताना म्हटलं की बुलढाणा शहरात शासकीय तंत्रनिकेतन येथे एक बोगस मतदार पळून जात असताना काही लोकांनी पकडले होते. पोलिसांनी तिथं पडताळणी करायला जात असताना इतर दोघांनी शासकीय कामात अडथळा केल्याची तक्रार प्राप्त झाल्यानं गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती रवी राठोड यांनी दिली आहे.

आज बुलढाणा शहरात नगरापालिकेचे मतदान सुरु असताना गांधी विद्यालय जिजामातानगर तीन बोगस मतदार असल्याबाबत तिथल्या मतदान केंद्राधिकाऱ्याकडून तक्रार प्राप्त झाली त्यावरुन तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  बोगस मतदान केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती देखील रवी राठोड यांनी दिली.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.