अमेरिकेत आता दीड वर्षच नोकरी करता येणार!पुतीन यांच्या पाहुणचारात मोदी बिझी असताना ट्रम्प यांचा घाला

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या पाहुणचारात बिझी असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी घाला घातला आहे. अमेरिकेच्या स्थलांतरण धोरणात मोठा बदल करण्यात आला आहे. त्या बदलामुळे स्थलांतरितांना अमेरिकेत आता केवळ दीड वर्ष नोकरी करता येणार आहे. त्यानंतरही नोकरी करायची असल्यास नव्याने परवाना काढावा लागेल. याचा सर्वाधिक फटका हिंदुस्थानला बसणार आहे.
दुसऱयांदा सत्तेत आल्यापासून ट्रम्प यांनी ‘अमेरिका फर्स्ट’ धोरण आक्रमकपणे राबवणे सुरू केले. त्याअंतर्गत टॅरिफ वृद्धी, एच 1 बी व्हिसा शुल्कवाढ असे निर्णय घेतले. त्याचा मोठा फटका हिंदुस्थानला बसला. आता त्यात आणखी भर पडली आहे. यूएस सिटिझनशिप अॅण्ड इमिग्रेशन सर्व्हिसेसने ग्रीन कार्डचे अर्जदार आणि इतर स्थलांतरितांच्या वर्क परमिटची वैधता 18 महिन्यांवर आणली आहे. परदेशातून अमेरिकेत होणाऱया स्थलांतराला आळा घालणे हा यामागचा उद्देश आहे. या निर्णयाचा परिणाम निर्वासित, आश्रयाच्या शोधात असलेले आणि प्रतीक्षा यादीत असलेल्या अर्जदारांवरही होणार आहे. हे बदल 5 डिसेंबर 2025 रोजी किंवा त्यानंतर दाखल झालेल्या किंवा प्रलंबित असलेल्या अर्जांना लागू होतील. अमेरिकेतील हिंदुस्थानी प्रोफेशनल्सवर याचा मोठा परिणाम होईल. दर दीड वर्षाने परवान्याचे नूतनीकरण करावे लागणार असल्याने आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे.
गोळीबाराचे निमित्त झाले आणि…
काही दिवसांपूर्वी व्हाईट हाऊसजवळ एका अफगाणी नागरिकाने अमेरिकी नॅशनल गार्डच्या दोन जवानांवर गोळीबार केला होता. त्यात एका जवानाचा मृत्यू झाला. त्यामुळे संतापलेल्या ट्रम्प यांनी 19 देशांच्या नागरिकांना प्रवेशबंदी करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्याचबरोबर ग्रीन कार्डचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला होता. त्याचाच भाग म्हणून ट्रम्प यांनी स्थलांतरण धोरणात बदल केला आहे.

Comments are closed.