चैत्यभूमीवर जनसागर लोटला, ज्ञानाच्या अथांग महासागरास कोटी कोटी प्रणाम

आपले संपूर्ण आयुष्य मानवतेच्या कल्याणासाठी अर्पण करणारे, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारे राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनी अभिवादन करण्यासाठी जनसागर आज चैत्यभूमीवर लोटला होता. देशाच्या कानाकोपऱयातून आलेल्या लाखो अनुयायांनी महामानवाच्या स्मृतींपुढे नतमस्तक होत वंदन केले.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी 5 डिसेंबरच्या दुपारपासूनच अनुयायांनी चैत्यभूमीपासून लांबच लांब रांगा लावल्या होत्या. आज राज्यपाल आचार्य देवक्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनाप्रमुख व शिवसेना नेते आदित्य ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर, खासदार अनिल देसाई, आमदार महेश सावंत आदी राजकीय नेते तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी चैत्यभूमीवर येऊन महामानवाला त्रिवार वंदन केले. याशिवाय देशाच्या कानाकोपऱयातून आपल्या कुटुंबकबिल्यासह आलेल्या अनुयायांनी चैत्यभूमीमध्ये नतमस्तक होत आपल्या उद्धारकर्त्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. विशेष म्हणजे तरुणांसह आबालवृद्ध व लहानग्यांची संख्या प्रचंड होती.

लाखोंचा जनसमुदाय चैत्यभूमीवर येणार असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिसांनी अचूक नियोजन केले होते. बृहन्मुंबई महागरपालिकेकडूनही आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या. शिवाय समता सैनिक दल तसेच विविध संस्था, संघटनांचे स्वयंसेवक, चळवळीतील कार्यकर्ते पोलिसांबरोबर तैनात होते. अनुयायांनीदेखील शिस्तीने रांगा लावून बाबासाहेबांना अभिवादन केले.

कोटय़वधी रुपयांची पुस्तके, प्रतिमा, मूर्तींची मोठी खरेदी

भीमसैनिकांनी नेहमीप्रमाणे यंदाही मोठय़ा प्रमाणात पुस्तके, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांच्या प्रतिमांची खरेदी केली. तसेच मूर्तीदेखील खरेदी केल्या. कोटय़वधी रुपयांच्या पुस्तकांची विक्री यावेळी झाली. पुस्तकांच्या खरेदीसाठी अनुयायांची लांबचलांब रांग लागली होती.

जलसे, पठणातटून जागर

अनेक शाहीर, जलसाकार व कलावंतांनी दिवसभर महामानवाच्या कार्याचा जागर केला. खेडय़ापाडय़ातून आलेल्या ज्येष्ठांनी जलसे पाहून बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. याशिवाय विविध संस्था, मंडळांनी ठिकठिकाणी कार्यक्रम आयोजित करून बाबासाहेब व त्यांच्या महान कार्याला उजाळा दिला.

अन्नदान, पाणीवाटप

विविध संस्था, संघटनांच्या वतीने भीमसैनिक व अभिवादन करायला आलेल्या नागरिकांसाठी मोफत अन्नदान, पाणी, चहावाटप तसेच खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले. शिवाय मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात आली. विविध कंपन्या, संस्थांनी स्टॉल लावून आपापल्या परीने योगदान दिले.

चैत्यभूमी, स्वच्छभूमी

छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात सामाजिक संस्था तसेच अन्य तरुण- तरुणींनी स्वंयस्फूर्तीने पुढाकार घेत चैत्यभूमी व छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पालिका कर्मचाऱयांबरोबर स्वच्छता मोहीम राबवली.

Comments are closed.