पुणे महापालिकेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढल्या तर कोणाला जास्त फायदा? प्रशांत जगतापांनी


पुणे: पुण्यात महापालिका निवडणुकीत दोन राष्ट्रवादी (NCP Party) एकत्र येणार नाहीत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) सगळ्यांना महाविकास आघाडी (MVA) म्हणून लढण्याचं सांगितलं असल्याची माहिती, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी काल (शनिवारी, ता ६) दिली आहे. सगळ्यांना महाविकास आघाडी म्हणून लढण्याचं सांगितलं आहे, त्यासाठी तयारी करा म्हणून देखील शरद पवारांनी सांगितलं असल्याचं जगतापांनी म्हटलं आहे. प्रशांत जगताप यांनी शरद पवारांसोबतच्या भेटीमध्ये पुणे शहराचा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लेखजोखा मांडला, काही दिवसांपूर्वी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेवर आता पूर्णविराम मिळाला आहे.

Prashant Jagtap: अजित पवारांच्या पक्षाच्या ४० ते ४५ जागा निवडून येतील

पुणे महापालिकेच्या निवडणूकीत दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्रित लढल्यास केवळ अजित पवारांच्या पक्षाचा फायदा होईल आणि आपल्या पक्षाच नुकसान होईल हे आपण शरद पवारांना पटवून दिल्याचा दावा प्रशांत जगताप यांनी केला आहे. दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पुण्यात एकत्र आल्यास अजित पवारांच्या पक्षाच्या ४० ते ४५ जागा निवडून येतील मात्र आमच्या फक्त तीन ते अकराच जागा निवडून येतील‌. मात्र दोन्ही राष्ट्रवादी स्वतंत्र लढल्यास शरद पवारांच्या पक्षाच्या २३ ते ४७ जागा निवडून येतील असं प्रशांत जगतापांच म्हणणं आहे. त्यामुळे त्यांनी अजित पवारांच्या पक्षासोबत पुण्यात आघाडी करण्यास विरोध केला आहे.

Prashant Jagtap: अजित पवार पुन्हा पुणे महापालिकेत भाजपसोबत युती करतील

प्रशांत जगतापांनी हे आकडेवारीनीशी शरद पवारांना पटवून दिल्यानंतर शरद पवारांनी त्यांना पाठिंबा दिल्याचं त्यांचं म्हणणं आहे. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी अजित पवार आग्रही असून शरद पवारांच्या पक्षात असलेल्या अंकुश काकडेंना त्यासाठी अजित पवारांनी फोन देखील केला होता. मात्र अंकुश काकडेंना आपण आपली बाजु पटवून दिल्याचं प्रशांत जगताप यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर निवडणूकीनंतर अजित पवार पुन्हा पुणे महापालिकेत भाजपसोबत युती करतील असही भाकित जगताप यांनी वर्तवलंय.

Prashant Jagtap: पुण्यासह राज्यात महानगरपालिकेच्या निवडणूका मविआ म्हणूनच लढू

याबाबत बोलताना प्रशांत जगताप म्हणाले होते, शरद पवार यांची भेट घेतली. त्यांनी वेळ दिला होता, त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली आहे. पुणे महानगरपालिकेत कशी लढत राहील, आपण महाविकास आघाडी सोबत लढलो तर काय होईल, इतर लोकांसोबत युती केली तर काय होईल, याचा लेखाजोखा त्यांच्यासमोर मांडला आहे. यावेळी शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे की पुण्यात आणि राज्यात आम्ही महानगरपालिकेच्या निवडणूका महाविकास आघाडी म्हणूनच लढू. शशिकांत शिंदे यांच्याशी देखील शरद पवार बोलले आहेत, शरद पवार, सुप्रिया सुळे आणि शशिकांत शिंदे यांनी पुणे महानगरपालिकेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणूनच लढवणार असल्याचं सांगितलं आहे, असंही प्रशांत जगताप यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा

Comments are closed.