टीम इंडियात सगळं काही ठीक.., वनडे मालिका जिंकल्यानंतर विराट–रोहितबद्दल गंभीरची मोठी प्रतिक्रिया
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका विरुद्ध वनडे मालिका जिंकली: ऑस्ट्रेलियात वनडे मालिका गमावल्यानंतर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दमदार पुनरागमन करत 3 सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली. विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या निर्णायक तिसऱ्या वनडेमध्ये भारताने 9 गडी राखून विजय मिळवत मालिका आपल्या नावावर केली. या मालिकेत पुन्हा एकदा विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी अप्रतिम कामगिरी करत दाखवून दिलं की त्यांच्याकडे अजूनही क्रिकेटसाठी भरपूर भूक आहे. आता तर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनीही दोघांबद्दल खास इच्छा व्यक्त केली आहे.
कोहली–रोहितच्या भविष्यावर सतत चर्चा सुरू…
गत दोन महिन्यांपासून विराट आणि रोहित यांच्या वनडे क्रिकेटमधील भविष्यावर सतत चर्चा सुरू होती. अनेक अहवालांमध्ये असा दावा केला जात होता की, ऑस्ट्रेलिया दौरा हा दोघांचा शेवटचा वनडे दौरा ठरू शकतो, कारण टीम मॅनेजमेंट आणि निवड समिती त्यांना 2027 विश्वचषकाच्या योजनांमध्ये पाहत नाहीत. मात्र योगायोगाने सलग दोन मालिकात हे दोघेच भारतासाठी सर्वोत्तम फलंदाज ठरले.
रोहित आणि विराटच्या सततच्या उत्कृष्ट कामगिरीने त्यांचं महत्त्व पुन्हा अधोरेखित झालं आहे. त्यामुळे त्यांना सध्या संघाबाहेर ठेवणे कठीण आहे आणि गंभीरच्या सामन्यानंतरच्या वक्तव्यातही त्याचे संकेत दिसले. पत्रकार परिषदेत तो म्हणाला की, “विराट आणि रोहित दोघेही अनेक वर्षांपासून भारतासाठी अशीच कामगिरी करत आले आहेत आणि पुढेही ते पांढऱ्या चेंडूच्या फॉर्मेटमध्ये अशीच सातत्यपूर्ण कामगिरी करतील, अशी मी अपेक्षा करतो.”
पुनरागमनानंतर दोघांनी घातला तांडव
सुमारे नऊ महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वनडे मालिकेत दोघांनी पुनरागमन केले होते. त्या मालिकेत रोहितने 203 धावा करून ‘प्लेयर ऑफ द सीरीज’ पुरस्कार जिंकला होता, तर कोहलीने शेवटच्या सामन्यात अर्धशतक झळकावले. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मात्र विराट कोहली सर्वाधिक 302 धावा करून मालिकेचा सर्वोत्तम खेळाडू ठरला, तर रोहितनेही दोन उत्कृष्ट अर्धशतके ठोकली. ही कामगिरी पाहता गंभीर यांची इच्छा स्पष्टच दिसते. विराट आणि रोहित हे दोघेही भारतीय संघाच्या वनडे योजनांमध्ये पुढील काही वर्षे महत्त्वाची भूमिका निभावतील.
टीम इंडियात सगळं काही ठीक….
मागील काही दिवसांपासून टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये वातावरण काहीसं बिनसलं असल्याच्या चर्चा रंगत होत्या. सराव सत्रादरम्यान विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर फार संवाद करताना दिसत नव्हते. त्यातच पहिला वनडे जिंकल्यानंतर हॉटेलमध्ये सेलिब्रेशनदरम्यान केक कट होत असताना विराट तिथे थांबला नाही आणि थेट आपल्या रूममध्ये गेला. यामुळे दोघांच्या नात्यात काहीतरी बिनसलं असल्याच्या अफवा अधिक वाढल्या. मात्र प्रत्यक्षात असे काहीही नाही. या साऱ्या चर्चांना पूर्णविराम देत आता मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी स्वतःच विराट कोहली आणि रोहित शर्माबद्दल खास इच्छा व्यक्त केली आहे. यावरून दोघांमध्ये कोणताही मतभेद नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
हे ही वाचा –
Gautam Gambhir : वनडे मालिका जिंकली, पण गौतम गंभीर संतापला! आमच्या कामात नाक खुपसू नये म्हणत नको नको ते बोलला, कुणावर राग काढला?
आणखी वाचा
Comments are closed.