पंचलाइन – स्टँड-अपमधील सघन साहित्यिकता

>> अक्षय शेलार

प्रचंड ऊर्जा, बुद्धिमत्ता, आत्मपरीक्षण, इत्यादी सगळ्यांचं विलक्षण मिश्रण असणारी जॅकलीन नोवॅक. ‘गेट ऑन युअर नीज’ मधून ती लैंगिकता, भाषा आणि मानवी शरीर यावर ती धाडसी आणि तितकंच कलात्मक भाष्य करते.
तिच्या स्टँड-अपची ही साहित्यिकता अत्यंत दुर्मिळ आहे. त्यामुळे दीड तास लांबीचे तिचे हे स्पेशल म्हणजे खरं तर एखाद्या तीन तासांच्या सिनेमाइतके संपूर्ण आणि आशयघन वाटते.

जॅकलीन नोवॅकचं ‘गेट ऑन युअर नीज’ हे केवळ स्टँड-अप स्पेशल नाही, तर ते स्टँड-अप या प्रकाराच्या मर्यादा ओलांडणारं एक काम आहे. भाषेवर, लैंगिकतेवर आणि मानवी शरीराच्या राजकारणावर आधारित एका नाटय़मय स्वगतासारखं त्याचं रूप आहे. नोवॅकने जवळजवळ दीड तास रंगमंचावर उभं राहून तयार केलेलं हे जग प्रचंड ऊर्जा, बुद्धिमत्ता, आत्मपरीक्षण, इत्यादी सगळ्यांचं विलक्षण मिश्रण आहे. तिच्या कामगिरीमध्ये एक अविरत गती आहे. सतत पुढे ढकलणारी, सतत काहीतरी प्रकट करणारी ही ऊर्जा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहणाऱ्यावर प्रभाव टाकते.

‘गेट ऑन युअर नीज’ या नावातच सूचक लैंगिक अन्वयार्थ आहे. नोवॅकचं स्पेशल लैंगिकतेच्या चर्चेला, स्त्राr शरीराला स्टँड-अपच्या केंद्रस्थानी आणतं. मात्र, ते कोणत्याही प्रकारच्या प्रचारक किंवा ओढून-ताणून केलेल्या सबलीकरणाच्या सुरात जात नाही. उलट, ती स्त्राrच्या इच्छाशक्तीला, तिच्या लैंगिक कुतूहलाला आणि तिच्या शरीराशी असलेल्या गुंतागुंतीच्या नात्यांना विनोदाच्या माध्यमातून एक ताजं, अनपेक्षित रूप मिळवून देते. तिची निरीक्षणं कधीही वरवरची नसतात. ती ऐकताना जाणवतं की, नोवॅक वरवर पाहता सेक्सबद्दल बोलते आहे, पण त्यामागे आपलीच भीती, असुरक्षितता आणि इच्छा उलगडत आहे. तिच्यासाठी लैंगिकता ही फक्त कृती नसून ती भाषा, शरीर आणि कल्पनाशक्ती यांच्यातील संवाद आहे.
या स्पेशलचा सर्वात मोहक पैलू म्हणजे नोवॅकची भाषिक दृष्टी. तिची भाषा जवळजवळ काव्यात्मक आहे. विचित्र, वेडीवाकडी वळणे घेणारी, तरीही कल्पक. ती कठीण, अतिशय वैयक्तिक स्वरूपाच्या विषयांना उच्च साहित्यिक रूप देते. सोपे, शारीरिक अनुभव ती शब्दांच्या सहाय्याने मिथकीय पातळीवर नेते. तिच्या स्टँड-अपची ही साहित्यिकता अत्यंत दुर्मिळ आहे. त्यामुळे दीड तास लांबीचे तिचे हे स्पेशल म्हणजे खरं तर एखाद्या तीन तासांच्या सिनेमाइतके संपूर्ण आणि आशयघन वाटते.

नोवॅकचा स्टेजवरील वावर हेदेखील या स्पेशलचं प्रमुख वैशिष्टय़ आहे. तिचा हा दीड तासांचा एकलप्रयोग नाटय़मयतेने भरलेला आहे. उंच स्वर, प्रचंड अतिशयोक्तीयुक्त, नाटय़मय हालचाल आणि देहबोलीने प्रेक्षकांना ताब्यात घेणारा. ती मंचावर चालताना, बसताना, डोळे मिटताना किंवा एखाद्या विचारात अडकताना तिचं संपूर्ण शरीर एका विशिष्ट तालात काम करतं. त्यामुळे ‘गेट ऑन युअर नीज’ हा प्रयोग कायमच स्टँड-अप आणि नाटक यांच्यामध्ये अलवारपणे तरंगत राहतो. दोन्हींचे गुण घेतलेला, पण दोन्हींसारखा नसलेला; दृश्य व भाषिक अशा दोन्ही अंगांना सामावून घेणारा. या स्पेशलचं मूळ तिच्याच एका ब्रॉडवे प्रयोगात असणं, हाही एक भाग त्यामागे असू शकतो.

नोवॅकच्या विचारविश्वात मानवी नातेसंबंधही तितकेच महत्त्वाचे आहेत. सेक्सविषयी बोलताना ती संबंधांच्या रहस्यांशी झुंजते. कुठली गोष्ट आपल्याला एकमेकांकडे आकर्षित करतं, कुठली बाब आपल्याला असुरक्षित बनवते इथून सुरुवात करीत मानवी जवळीक ही फक्त शारीरिक नाही, तर बौद्धिक, भाषिक आणि भावनिक संवादांचा विस्तार आहे इथपर्यंत ती येऊन पोचते. तिच्या सेटमध्ये हे सगळं हलकं, मजेशीर वाटतं, पण त्यात नेहमीच एक व्यापक, गंभीर विचाराचा अंतप्रवाह असतो.
लैंगिकता, भाषा आणि मानवी शरीर यावरील तिचं हे भाष्य धाडसी, आकर्षक आणि अत्यंत कलात्मक आहे. स्टँड-अपच्या चौकटीत इतक्या सघन साहित्यिकतेने आणि नाटय़पूर्णतेने काम करणारा असा आवाज आज फारच कमी आढळतो. त्यामुळेच समकालीन स्टँड-अपमध्ये जॅकलीन नोवॅकचा हा प्रयोग, निर्भीडपणे स्त्राrच्या इच्छांना आणि भाषेच्या शक्तीला केंद्रस्थानी आणत, स्वतच्याच पायावर उभं राहिलेलं एक महत्त्वाचं सांस्कृतिक विधान बनतो.

[email protected]

Comments are closed.