वनडे मालिका जिंकताच गौतम गंभीरने टीकाकारांना फटकारलं, IPL संघ मालकाचाही घेतला समाचार, म्हणाला…

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पार पडलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 9 विकेट्सने धुव्वा उडवला आणि सामन्यासह 2-1 अशा फरकाने मालिकाही जिंकली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी टीकाकारांना सुनावलं आहे. कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेने वाईट व्हॉश देत मालिका जिंकली, तेव्हा गौतम गंभीर यांच्या प्रशिक्षकपदावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते. तसेच प्रशिक्षक बदलण्याची मागणी सुद्धा करण्यात आली होती.

तिसऱ्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव केल्यानंतर गौतम गंभीर यांनी पत्रकार परिषदेमध्ये टीकाकारांची शाळा घेतली आहे. ते म्हणाले की, “कसोटी मालिकेत निकाल आमच्या मनासारखे लागले नाहीत, तेव्हा खूप चर्चा झाली. पण आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे कोणत्याही माध्यमाने किंवा पत्रकाराने एकदाही लिहिले नाही की, आमचा पहिला कसोटी सामना कर्णधाराशिवाय खेळला गेला, दुखापतीमुळे दोन्ही डावात त्याने फलंदाजी केली नाही.” असं गौतम गंभीर म्हणाले आहेत. शुभमन गिल मानेच्या दुखापतीमुळे दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये फलंदाजी करू शकला नाही. पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात त्याने फलंदाजी केली. मात्र त्यानंतर तो मैदानात उतरला नाही. हेच गौतम गंभीर यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना अधोरेखित केले.

चमकदार विजय!

पत्रकार परिषदेत बोललताना गौतम गंभीर यांनी दिल्ली कॅपिटल्स संघाचा मालक पार्थ जिंदलवरही निशाना साधला. कसोटी मालिकेतील पराभवानंतर पार्थ जिंदलने कसोटी आणि वनडे-टी20 साठी वेगवेगळ्या प्रशिक्षकांची मागणी केली होती. यावर गौतम गंभीर म्हणाले की, “एका IPL संघाच्या मालकाने स्प्लिट कोचिंकबद्दल (कसोटी आणि वनडे-टी20 साठी वेगळा प्रशिक्षक) लिहिले. हे सर्व खरोखर आश्चर्यकारक आहे. लोकांनी त्यांच्या मर्यादेत राहणे महत्त्वाचे आहे. जर आम्ही कोणाच्या कार्यक्षेत्रामध्ये हस्तक्षेप करत नसू तर त्यांनीही आमच्यावर टिप्पण्या देऊ नये.” असं म्हणत गौतम गंभीर यांनी अप्रत्यक्षपेणे पार्थ जिंदलला सुनावलं आहे.

Comments are closed.