अंड्यांमुळे खाणकाम थांबले
केवळ काही अंड्यांमुळे एका खाणीचे खोदकाम महिनाभर थांबविण्यात आले, असे आपल्या कोणी सांगितले तर आपला विश्वास बसणे कठीण आहे. तथापि, भारताच्या तेलंगणा या राज्यात अशी घटना खरोखरच घडली आहे. खाणीचे खोदकाम अशा प्रकारे थांबविण्याचा निर्णय तेलंगणाचा वनविभाग आणि खाणीचे मालक यांनी घेतला आहे. या घटनेची सविस्तर माहिती अशी आहे, की या खाणीच्या परिसरात, ज्याचे दर्शन अत्यंत दुर्मिळ आहे अशा आणि नामषेश होण्याच्या मार्गावर असणाऱ्या ‘रॉक इगल’ नामक गरुडाचे दिसून आले. या घरट्यात पाच अंडीही होती. खाणीचे खोदकाम तसेच चालू ठेवले असते, तर हे घरटे पडले असते आणि त्यातील अंडी फुटली असती. त्यामुळे अत्यंत दुर्मिळ असणारी ही प्रजाती आणखीनच धोक्यात आली असती. ज्यावेळी हे घरटे खाण कामगारांच्या दृष्टीला पडले, तेव्हा त्यांनी त्याची माहिती आपल्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना कळविली. वरीष्ठ अधिकाऱ्यांनी ती तेलंगणाच्या वनविभागाला कळविली. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष येऊन या घरट्याची पाहणी केली. तसेच पक्षीतज्ञांनाही पाचारण करण्यात आले. त्यांनी ही अंडी अत्यंत दुर्मिळ अशा गरुडाची असल्याचा निर्वाळा दिला. ही अंडी उबून त्यांच्यातून पिले बाहेर येण्याला, तसेच ती पिले उडण्याच्या स्थितीत येण्याला एक महिन्याचा कालावधी लागणार होता. त्यामुळे ती पिले उडून दुसरीकडे जाईपर्यंत खाणकाम थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला. खाणीच्या मालकानेही तो मान्य केला आहे.
या कामी एका छायाचित्रकाराचा सजगपणाही कामी आला आहे. या छायाचित्रकारानेही या घरट्याची माहिती आणि या गरुडाच्या प्रजातीची माहिती वनविभागाला कळविली होती. तसेच खाणकाम सुरु ठेवल्यास या घरट्याला धोका आहे, असा इशारा दिला होता. हा गरुड खडकाळ आणि कोरड्या प्रदेशातील पक्षी आहे. त्यामुळे तो झाडांवर घरटे न बांधता उंच जागी असणाऱ्या खडकांवरच ते बांधतो. त्यामुळे मानवाचा या गरुडाला नेहमी धोका असतो. तथापि, या प्रसंगी तरी हा छायाचित्रकार आणि वनविभाग यांच्यामुळे या गरुडाच्या काही पिलांना तरी नवजीवन मिळत आहे. या सजगतेचे आणि सहृदयतेचे कौतुक केले जात आहे.
Comments are closed.