2-3 वर्षांत असा खेळलोच नव्हतो…, स्वतःला पुन्हा सिद्ध करत विराट कोहलीने टीकाकारांना दिलं उत्तर


विराट कोहलीला प्लेअर ऑफ द सिरीजचा किताब : भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत दमदार पुनरागमन केले. फॉर्मवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना कोहलीने प्रत्येक सामन्यात महत्त्वपूर्ण धावा करून टीकाकारांना योग्य उत्तर दिले. मालिकेच्या शेवटच्या सामन्यात त्याने नाबाद 65 धावा ठोकत भारताला 9 विकेट्सने विजय मिळवून दिला आणि मालिका आपल्या नावावर केली.

या मालिकेत कोहलीने 135, 102 आणि नाबाद 65 अशा तीन प्रभावी खेळी खेळल्या. त्यापैकी रांचीतील त्याचे 52वे वनडे शतक सर्वात संस्मरणीय ठरले. या उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 20वा प्लेअर ऑफ द सीरीज पुरस्कार मिळाला. पुरस्कार मिळाल्यानंतर कोहलीने आपल्या कामगिरीवर मोठे वक्तव्यही केले, ज्याने त्याच्या आत्मविश्वासाची आणि संघावरील निष्ठेची पुन्हा एकदा झलक दिली.

2-3 वर्षांत असा खेळलो नव्हतो… – विराट कोहली

शनिवारी भारताने दक्षिण आफ्रिकेला 9 विकेटने पराभूत करत मालिका 2-1 ने जिंकली. त्यावेळी विराट कोहली म्हणाला की, “या मालिकेत मी जसा खेळलो, ते माझ्यासाठी सर्वात समाधानाची गोष्ट आहे. मी कसलाही दबाव जाणवत नव्हता. गेल्या दोन-तीन वर्षांत असा खेळलो नव्हतो. मला माहिती आहे की मी अशी फलंदाजी केली तर टीमला खूप मदत होते. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढतो की कोणतीही परिस्थिती हाताळून मी सामना आपल्या बाजूला वळवू शकतो.”

अनुभव असला तरी काही वेळा मनात शंका येतात…. – विराट कोहली

विराटने मान्य केले की कितीही अनुभव असला तरी काही वेळा मनात शंका येतात. तो म्हणाला की, “15-16 वर्षे खेळताना काही वेळा स्वतःवर शंका येते. विशेषतः फलंदाज म्हणून, कारण एक चूक तुम्हाला बाद करू शकते. ही संपूर्ण प्रक्रिया तुम्हाला चांगला खेळाडू आणि चांगला माणूस बनवते. मला आनंद आहे की मी अजूनही संघासाठी योगदान देत आहे. जेव्हा मी खेळतो तेव्हा मला ठाऊक असते की मी षटकार मारू शकतो आणि त्या वेळी आत्मविश्वास उच्चांकावर असतो. रांचीतील शतक विशेष होते कारण ऑस्ट्रेलियानंतर मी कोणताही सामना खेळला नव्हता. रांची माझ्यासाठी खूप खास आहे आणि ही तीनही सामने अशा पद्धतीने झाले याचा मला आनंद आहे.”

कर्णधार केएल राहुलची प्रतिक्रिया

दक्षिण आफ्रिकेला 270 धावांत रोखल्यानंतर राहुल म्हणाला, “पहिल्या दोन सामन्यांत परिस्थिती कठीण होती. गच्च आऊटफील्डमुळे गोलंदाजांना अडचण येत होती. या सामन्यात त्यांना मिळालेला ब्रेक खूप महत्त्वाचा ठरला. विकेट फलंदाजीसाठी चांगली होती, पण आम्ही एकाच वेळी अनेक विकेट घेण्यात यशस्वी झालो.”

हे ही वाचा –

टीम इंडियात सगळं काही ठीक…, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिका जिंकल्यानंतर विराट–रोहितबद्दल गौतम गंभीरची मोठी प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाला?

आणखी वाचा

Comments are closed.