बिबट्यांची नसबंदी करण्याचा निर्णय चुकीचा, तज्ज्ञांचे मत; बिबट्यांची संख्या वाढण्याचे कारणही केले स्पष्ट

सॅंक्च्युरी वाइल्डलाईफ अवॉर्ड्स 2025 कार्यक्रमात शुक्रवारी वन्यजीव संवर्धन आणि छायाचित्रण क्षेत्रातील नामांकित व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमानंतर महाराष्ट्र सरकारने अलीकडे जाहीर केलेल्या मानव–बिबट्या संघर्षात सहभागी बिबट्यांची नसबंदी करण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना सॅंक्च्युरी आशियाचे संस्थापक संपादक व पर्यावरणतज्ज्ञ बिट्टू सहगल यांनी हा उपाय पूर्णपणे चुकीचा असल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.
बिट्टू सहगल म्हणाले की, बिबट्यांची नसबंदी करण्याची कल्पना अंमलात आणली तरी त्याचा काहीही परिणाम होणार नाही. “हे उपाय काम करणार नाहीत. शिवाय बिबट्यांना पकडून बेशुद्ध करून प्राणिसंग्रहालयात ठेवणे हेही निरुपयोगी ठरेल,” असे सहगल यांनी ठामपणे सांगितले. त्यांच्या मते, हा उपाय समस्या सोडवण्याऐवजी निसर्गचक्राशी छेडछाड करणारा असून त्यामुळे परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे.
जुन्नर परिसरातील बिबट्यांच्या वाढत्या संख्येचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की ही समस्या नैसर्गिक नसून मानवनिर्मित आहे. कळसूबाई–हरिश्चंद्रगड अभयारण्य परिसरात उभारण्यात आलेल्या पंप स्टोरेज प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर जंगल नष्ट झाले आणि वन्यजीव मार्ग तुटले. या प्रकल्पातून मिळणारे पाणी ऊस शेतीसाठी वळवण्यात आले आणि या ऊस शेतीत बिबट्यांना आश्रय मिळाल्याने त्यांची संख्या झपाट्याने वाढली.
सहगल म्हणाले, “आज आपण जे बिबटे पाहत आहोत, ते निसर्गाने नाही तर आपण तयार केलेले आहेत. ही समस्या नसबंदीने सुटणार नाही. दोनच पर्याय उरतात — जमीन पुन्हा वनस्वरूपात आणा किंवा कायम संघर्ष सहन करत बिबटे मारत राहा.” त्यांनी लोकांनी घेतलेल्या निर्णयांमध्ये निसर्ग आणि स्थानिक परिसंस्था यांचा आदर असणे गरजेचे असल्याचे अधोरेखित केले.
त्यांच्या म्हणण्यानुसार, बिबट्यांची नसबंदी करण्याचा निर्णय हा तात्पुरती डोळेझाक करणारा उपाय आहे, तर खरी गरज आहे ती निसर्ग पुनरुज्जीवनाची. “आपण निसर्गाशी सूड उगवण्याऐवजी त्याच्याशी समजूतदारपणे वागायला शिकलो, तर संघर्ष कमी होईल,” असे ते म्हणाले.

Comments are closed.