ऋतुराज आणि यशस्वीच्या वनडे भविष्याबद्दल प्रशिक्षक गंभीरचं स्पष्टीकरण! अय्यर-गिल परतल्यावरही संधी मिळणार?
भारत आणि दक्षिण आफ्रिका (Odi Series IND vs SA) यांच्यातील वनडे मालिका 2-1 ने भारताने जिंकली आहे. ही मालिका रोहित शर्मा (Rohit Sharma & Virat Kohli) आणि विराट कोहली यांच्यासाठी खूप खास ठरली. त्यांच्याशिवाय, तरुण फलंदाज ऋतुराज गायकवाड (Ruturaj gaikwad) आणि यशस्वी जयस्वाल (Yashsvi jaiswal) यांनीही चांगली कामगिरी केली, दोघांनीही मालिकेत प्रत्येकी एक शतक झळकावले.
शुबमन गिलच्या (Shubman gill) जागी यशस्वी आणि श्रेयस अय्यरच्या (Shreyas iyer) जागी ऋतुराज खेळत होते. आता जेव्हा गिल आणि अय्यर संघात परततील, तेव्हा या तरुण खेळाडूंचे काय होईल, हाच प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. यावर आता मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी आपले मत मांडले आहे.
प्रेस कॉन्फरन्समध्ये गौतम गंभीर यांनी ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जयस्वाल या दोघांचेही कौतुक केले. ऋतुराज गायकवाडबद्दल गंभीर म्हणाले की, ऋतुराजने त्याच्या नेहमीच्या फलंदाजीच्या स्थानावरून हटून फलंदाजी केली, जे त्याची गुणवत्ता दर्शवते. ते म्हणाले, तो एक उत्कृष्ट खेळाडू आहे. तो ‘इंडिया ए’ साठी चांगल्या फॉर्ममध्ये असल्याने आम्हाला त्याला संधी द्यायची होती. त्याने दोन्ही हातांनी संधीचा फायदा घेतला आणि दबावाखाली असताना अशा पद्धतीने शतक ठोकणे त्याची गुणवत्ता दर्शवते. यशस्वी जयस्वालबद्दल गंभीर म्हणाले, यशस्वी जयस्वालची गुणवत्ता आपण कसोटी क्रिकेटमध्ये पाहिली आहे. व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये त्याची ही फक्त सुरुवात आहे. ते पुढे म्हणाले, आम्हाला आशा आहे की त्याचे भविष्य चांगले असेल आणि ऋतुराजसाठीही आम्हाला तशीच अपेक्षा आहे.
गौतम गंभीर यांनी हे देखील स्पष्ट केले की श्रेयस अय्यर आणि शुबमन गिल परतल्यानंतर थेट प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवतील. त्यांनी जयस्वाल आणि गायकवाड यांना संधीची वाट पाहण्यास सांगितले.
गंभीर म्हणाले, आम्ही त्यांना शक्य होईल तेव्हा संधी देण्याचा प्रयत्न करतो, कारण आम्हाला विश्वचषकासाठी सुमारे 20-25 खेळाडूंची गरज आहे. जेव्हाही आम्हाला संधी मिळते, आम्ही नवीन खेळाडूंना संधी देतो. परंतु, जेव्हा कर्णधार आणि उपकर्णधार रोहित, विराट, गिल, अय्यर परत येतील, तेव्हा तेच सुरुवात करतील. गायकवाड आणि जयस्वाल यांना जेव्हाही संधी मिळेल, तेव्हा त्यांनी तयार राहायला हवे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत दोन्ही युवा फलंदाजांची कामगिरी चांगली झाली. यशस्वी जयस्वालने सलामीवीर म्हणून 3 डावांमध्ये 78 च्या सरासरीने 156 धावा केल्या, ज्यात तिसऱ्या वनडेतील नाबाद 116 धावांच्या खेळीचा समावेश आहे. ऋतुराज गायकवाडने सलामीवीर असूनही 4 थ्या क्रमांकावर खेळताना 2 डावांमध्ये 56.60 च्या सरासरीने 113 धावा केल्या, ज्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे.
Comments are closed.