हैदराबादमधील रस्त्याला ट्रम्प यांचे नाव देण्यात आले

मुख्यमंत्री रेड्डी यांचा प्रस्ताव : भाजपकडून संतप्त प्रतिक्रिया

सर्कल संस्था/हैदराबाद

तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी  यांनी हैदराबादमधील एका रस्त्याला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मांडला आहे. तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय तेलंगणा रायजिंग ग्लोबल समिटदरम्यान आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न असू शकतो. परंतु यावरून मुख्यमंत्री रेड्डी हे विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या प्रस्तावावर भाजपने टीका केली आहे.

हैदराबादमध्ये अमेरिकेच्या महावाणिज्य दूतावासाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याचे नाव ‘डोनाल्ड ट्रम्प अॅव्हेन्यू’ ठेवण्यात यावे असा प्रस्ताव मुख्यमंत्री रेड्डी यांनी मांडला आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यास अमेरिकेच्या वर्तमान अध्यक्षांचा विदेशात अशाप्रकारे सन्मान होण्याची ही पहिलीच वेळ असेल. शहराच्या विकासात योगदान देणारे राजकीय नेते आणि जागतिक कंपन्यांची नावे हैदराबादमधील रस्त्यांना देण्यात आली आहेत. यात गूगल स्ट्रीट सामील असून हे नाव हैदराबादमधील गुगलची उपस्थिती दर्शविते. अशाचप्रकारे शहरात ‘मायक्रोसॉफ्ट रोड’ आणि ‘विप्रो जंक्शन’ आहे.

हैदराबादरचे नाव भाग्यनगर करा

तेलंगणातील भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री बंदी संजय कुमार यांनी मुख्यमंत्री रेड्डीयांच्या या प्रस्तावावर टीका करत अगोदर हैदराबादचे नाव बदलून भाग्यनगर करण्याची मागणी केली आहे. काँग्रेस सरकार नाव बदलण्यासाठी इतके आतूर असेल तर त्यांनी इतिहासाशी संबंधित नाव द्यावे. एकीकडे केटी रामाराव हे केसीआर यांच्या मूर्ती निर्माण करण्यात व्यग्र आहेत, तर दुसरीकडे रेवंत रेड्डी हे  रस्त्यांना विदेशी नेत्यांचे नाव देऊ पाहत आहेत. यादरम्यान केवळ भाजपच राज्य सरकारला जबाब विचारत असून आंदोलनाद्वारे लोकांचे प्रश्न उपस्थित करत असल्याचा दावा बंदी संजय कुमार यांनी केला आहे.

 

 

Comments are closed.