पंगत – ग्रीष्मातला रसास्वाद

>> स्नेहल बनसोडे
[email protected]

उन्हाळा- ग्रीष्म ऋतू, अंग पोळवणारं ऊन आणि घामाच्या धारा, पण खवय्यांसाठी जणू नवनव्या चवींचा महोत्सवच. कारण उन्हाळा चवींचे सप्तरंगच घेऊन येतो. बहुतांश जनता उन्हाळ्याची वाट पाहते ती फळांच्या राजाच्या आगमनासाठी- मनसोक्त आंबे खाण्यासाठी! पण अस्सल खवय्ये मात्र आंब्याइतकेच, किंबहुना काकणभर जास्त महत्त्व देतात ते कैरीला- कैरीच्या पदार्थांना. नुसती तिखटमीठ लावलेली कैरी, कैरीचं तात्पुरतं लोणचं, चटणी, मेथांबा, साखरांबा, गुळांबा, सखूबद्दा, कांदाकैरी, चैत्र गौरीसाठी खास आंब्याची डाळ… कितीतरी प्रकार आणि मग मे महिन्याच्या शेवटी साठवणीच्या लोणच्याची गृहिणींची लगबग सुरू होते. आपापल्या घरच्या पद्धतीनुसार निगुतीनं लोणचं घातलं जातं. कुणी साधं, कुणी लसूण घालून, कुणी खान्देशी गरम मसाला आणि गूळ घालून, तर कुणी कारळं घालून लोणचं करतं… आणि हो, खास हापूस आंब्याचा सोनेरी साखरांबा किंवा जामसुद्धा याच महिन्यात घातला जातो.

फळांच्या राजाचं कौतुक तर काय वर्णावं? खरं तर अक्षय्य तृतीयेपासून आंबे खाण्याची आपली जुनी रीत, पण काही आम्ररसिकांना तेवढाही धीर धरवत नाही. बाजारात आंबे दिसायला लागले आणि खिशाला परवडायला लागले की, घरोघरी आंबे दिसायला लागतात. हापूसला अग्रपूजेचा मान असला तरी पायरी, केशर, लालबाग, लंगडा, दशहरी, नीलम, बैंगनपल्ली, रायवळ, बदाम आणि अनंत प्रकारच्या आंब्याचा घरोघरी आस्वाद घेतला जातो. आंब्याचा रस, फोडी, चोखून हे सगळे प्रकार झाले की, मग कोयाडं, सासव, आंब्याची कढी, मॅंगोला, आंब्याचे घरगुती आईक्रीम- मिल्क शेक, मग आंब्याची साटं, साठवणुकीचा रस असा आबालवृद्धांच्या आवडीचा बेत होतो.

आंब्याइतकं ग्लॅमर नसलं तरी कलिंगड, खरबूज, जांभूळ, करवंद ही चविष्ट फळंसुद्धा उन्हाळ्यात तृषा भागवतात आणि कडक उन्हाच्या दुष्परिणामांपासून आपलं रक्षण करतात. यासोबत लिंबू सरबत, कोकम सरबत, करवंद सरबत, कैरीचं पन्हं, उन्हाळ्याच्या सुट्टीत पत्त्याचे डाव आणि नंतर गारेगार बर्फाचा गोळा किंवा आईस्कीम यानं मुलांची मज्जाच सुरू असते. सोबत उन्हाळ्याची सुट्टी असल्याने संध्याकाळच्या चारीठाव जेवणाला काट मारून कैरी घालून मस्त भेळ, पाणीपुरी, रगडापुरी, पावभाजी किंवा घरी बनवलेला पास्ता, सँडविचेस यांवर मुलांचा भर असतो. अनेक जण या काळात आईला स्वयंपाकघरात मदत करून आपली शेफगिरीही गाजवतात.

याशिवाय उन्हाळ्याची चाहूल लागत नाही तोच महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात गृहिणींची लगबग सुरू होते ती वाळवणासाठीची. सुरुवात साध्या बटाटय़ाच्या वेफर्सपासून होते ती पुढे साबुदाण्याच्या पळीपापडय़ा, उडीद-मुगाचे पापड, तांदळाच्या सालपापडय़ा किंवा कोकणातल्या फेण्या, विदर्भात ज्वारीचे धापोडे, खान्देशातला करायला अतिशय अवघड प्रकार बिबडय़ा, तीन दिवस भिजवलेल्या गव्हाचं पाणी बदलून चीक काढून तो शिजवून निगुतीनं घातलेल्या पांढऱयाशुभ्र सुरेख कुरडया, खान्देशातले नागलीचे पापड, मग मिश्र डाळींचे सांडगे, विदर्भातल्या मूगवडय़ा, खान्देशातले झारलेले मटकी- मुगाचे वडे, हातावरच्या नाजूक शेवया, विदर्भातले काडीवरचे सरगुंडे…बापरे किती प्रकार! यासोबतच अनेक जणी उन्हाळ्यातच वर्षभराची हळद, तिखट, घरगुती गोडा मसाला किंवा कांदा लसूण, काळा / लाल/ मालवणी मसाला असे सगळे प्रकार बनवतात. त्यासाठी पाककृतींची देवाणघेवाण होते, आई, सासूबाई, मावशी अशा ज्येष्ठांचा सल्ला घेतला जातो, जुन्या वह्या आणि ‘रुचिरा’सारखी पुस्तकं परत परत चाळली जातात. शहरी भागात हे मसाले, वाळवणं, लोणचं करायचं प्रमाण कमी झालं असलं तरी खात्रीशीर गृहउद्योगातून केलेल्या या पदार्थांना शहरातसुद्धा आजही मागणी आहे. कारण आपलं सणाचं ताट पापड, कुरडई, लोणचं आणि शेवयाची खीर याशिवाय सजत नाही. तितकाच ग्रामीण भागातील महिलांच्या हातांना रोजगार मिळतो आणि आपल्याला चविष्ट पदार्थ घरबसल्या मिळतात.
(लेखिका मुक्त पत्रकार व खाद्य उद्योजक आहेत)

Comments are closed.