थेट परकीय गुंतवणुकीत लक्षणीय वाढ

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

आर्थिक वर्ष 2026 मध्ये भारतात झालेल्या थेट विदेशी गुंतवणुकीत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तसेच भारताबाहेर गेलेल्या गुंतवणुकीचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे हे आर्थिक वर्ष गुंतवणुकीच्या दृष्टीने वैशिष्ट्यापूर्ण ठरले आहे, अशी माहिती केंद्रीय सांख्यिकी विभागाने प्रसारीत केली आहे. आंतरराष्ट्रीय परिस्थिती आव्हानात्मक असूनही भारताची अर्थव्यवस्था वाढीचा दर सर्वाधिक आहे.

आर्थिक वर्ष 2026 मध्ये भारतात 94.5 अब्ज डॉलर्सची स्थूल थेट विदेशी गुंतवणूक करण्यात आली आहे. भारताबाहेर गेलेल्या गुंतवणुकीची वजावट करता निव्वळ थेट विदेशी गुंतवणुकीचे प्रमाण 7.7 अब्ज डॉलर्स इतके आहे. आर्थिक वर्ष 2025 मध्ये निव्वळ थेट विदेशी गुंतवणूक 1 अब्ज डॉलर्सपेक्षाही कमी होती. त्यामुळे आर्थिक वर्ष 2026 मध्ये निव्वळ थेट विदेशी गुंतवणुकीचे प्रमाण त्याच्या मागच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 7.8 पट वाढल्याचे दिसून येत आहे. अर्थतज्ञांनी पैशाच्या या हालचालींचा विषेश अभ्यास केला असून निष्कर्ष स्पष्ट केला. भारतीय कंपन्या आता भारताबाहेरही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. त्यामुळे विदेशी कंपन्या भारतात जितका पैसा गुंतवतात, तितका नसला, तरी बऱ्याच प्रमाणात भारतीय कंपन्याही विदेशात पैसा गुंतवून उद्योग स्थापन करीत आहेत. अमेरिकेतही भारतीय कंपन्याची गुंतवणूक होत आहे. त्यामुळे भारताबाहेर पैसा जाण्याचे प्रमाणही वाढले आहे. काही विदेशी कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात भारताच्या वित्तबाजारातून निर्गुंतवणूक केली आहे. विशेषत: ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2025 मध्ये थेट विदेशी गुंतवणुकीचे प्रमाण नकारात्मक पातळीवर पोहचले होते. तथापि, नंतरच्या महिन्यामध्ये थेट विदेशी गुंतवणुकीचा ओघ मोठ्या प्रमाणात वाढल्याने आर्थिक वर्षाच्या अखेरीस निव्वळ विदेशी गुंतवणूक वाढली.

Comments are closed.