श्रेयस अय्यरची विराट-रोहितच्या खास क्लबमध्ये एन्ट्री! आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून मोठा विक्रम

पंजाब किंग्जने आयपीएल 2026 मधील आपला लीग-फेरीतील शेवटचा सामना लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध 7 गडी राखून जिंकत, आपल्या प्लेऑफमधील आशा जिवंत ठेवल्या आहेत. पंजाबने 197 धावांचे लक्ष्य सहजपणे गाठले; या विजयात कर्णधार श्रेयस अय्यरने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. या सामन्यात, श्रेयसने 101 धावांची नाबाद खेळी करत आपल्या नावावर एका मोठ्या विक्रमाचीही नोंद केली.

आयपीएच्या 19 वर्षांच्या इतिहासात, सातत्यपूर्ण फलंदाजी आणि प्रभावी नेतृत्व या दुहेरी जबाबदाऱ्या यशस्वीपणे पेलणारे फारच कमी कर्णधार होऊन गेले आहेत. श्रेयस अय्यर हा अशाच मोजक्या नावांपैकी एक म्हणून समोर आला आहे. दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि आता पंजाब किंग्जचे नेतृत्व करताना, श्रेयसने आपली एक वेगळीच छाप उमटवली आहे. त्याने केकेआरला विजेतेपद मिळवून दिले, तसेच दिल्ली आणि पंजाब या दोन्ही संघांना अंतिम फेरीत पोहोचवण्यातही त्याने मोलाची भूमिका बजावली.

लखनऊविरुद्धच्या 101 धावांच्या नाबाद खेळीमुळे, श्रेयस अय्यरने आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून 3000 धावांचा टप्पाही ओलांडला आहे. आयपीएलच्या इतिहासात ही कामगिरी करणारा तो सहावा कर्णधार आणि पाचवा भारतीय खेळाडू ठरला आहे.

आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारे खेळाडू

विराट कोहली – ४९९४ धावा
एमएस धोनी – 4753 धावा
रोहित शर्मा – ३९८६ धावा
गौतम गंभीर – 3518 धावा
डेव्हिड वॉर्नर – 3356 धावा
श्रेयस अय्यर – 3024 धावा

या सामन्यात, श्रेयस अय्यरने टी20 क्रिकेटमध्येही एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. त्याने आपल्या कारकिर्दीत 7000 धावांचा टप्पा ओलांडला असून, ही कामगिरी करणारा तो चौथा सर्वात वेगवान भारतीय फलंदाज ठरला आहे. टी20 क्रिकेटमध्ये श्रेयसच्या नावावर आता 4 शतके आणि 48 अर्धशतके आहेत.

Comments are closed.