भटकंती – सावर्डेचे समृद्ध कलादालन

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

>> आशुतोष बापट
[email protected]

कोकणावर जसा निसर्गाचा वरदहस्त बघायला मिळतो तसेच हा प्रांत म्हणजे कलाकारांची मांदियाळी आहे. अक्षरश असंख्य कलाकार या भूमीने भारताला दिलेत. कला आणि कलाकार यांना कोकणात तोटाच नाही. चिपळूण, गुहागर परिसरात हिंडताना चिपळूणपासून 15 कि.मी.वर असलेल्या सावर्डे या गावी असेच एक नितांतसुंदर समृद्ध कलादालन बघायला मिळते. सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट या शिक्षण संस्थेचे कलादालन. सावडर्य़ावरून आपण रत्नागिरीच्या दिशेने जाऊ लागलो की वहाळ फाटा येतो. इथे उजवीकडे जवळजवळ 45 एकर एवढय़ा भूभागावर उभी आहे एक खूप मोठी शिक्षण संस्था. ‘सह्याद्री शिक्षण संस्था’ असे तिचे नाव. कोकणचे सुपुत्र शिक्षणमहर्षी स्वर्गीय गोविंदराव निकम यांनी 1993 साली ‘सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट-सावर्डे’ या चित्र-शिल्प कला महाविद्यालयाची स्थापना केली. या कामी त्यांना ज्येष्ठ चित्रकार आणि शिल्पकार असलेल्या प्राचार्य श्री. प्रकाश राजेशिर्के सरांची मोठी साथ लाभली. गेली 30 वर्षे हे आर्ट स्कूल अव्याहतपणे एकाहून एक सरस विद्यार्थी घडवून समाजाला अर्पण करत आहेत. हे विद्यार्थी आपल्या कलेच्याद्वारे या आर्ट स्कूलचे नाव जगभर गाजवत आहेत.

सह्याद्री आर्ट स्कूलच्या या कलादालनात संस्थेच्या विद्यार्थ्यांनी, माजी विद्यार्थ्यांनी आणि या क्षेत्रातल्या विविध नामांकित कलाकारांनी चितारलेली विविध चित्रे आणि शिल्पे मांडून ठेवलेली आहेत. जे. जे. स्कूलचे जॉन डग्लस, शिरोडकर, माजगावकर यांच्यासह सुप्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत यांनी चितारलेल्या अप्रतिम कलाकृती इथे आपल्याला बघायला मिळतात. या कलादालनात आजमितीला 500 हून अधिक नुसती लँडस्केप आहेत. लोखंडी पत्र्यावर केलेली पोर्ट्रेटस् ही इथली अजून एक खासियत. या स्कूलमध्ये मुलांचे प्रत्यक्ष शिक्षण कसे चालते हेसुद्धा बघता येते. पोर्ट्रेट शिकण्यासाठी इथे मॉडेल मिळायची मारामार त्यामुळे मुलेच आळीपाळीने मॉडेल म्हणून बसतात आणि मग त्या मॉडेलवरून विविध अंगांनी इथे चित्रकला शिकवली जाते.

शिल्पकला दालनात निरनिराळी देखणी शिल्पे ठेवलेली आहेत. विद्यार्थ्यांचे एखाद्या संकल्पनेविषयी असलेले सखोल ज्ञान आणि त्यातून निर्माण झालेली देखणी कलाकृती पाहून थक्क व्हायला होते. या सगळ्यात सर्वात वैशिष्टय़पूर्ण म्हणता येईल अशी कलाकृती म्हणजे सदानंद कृष्णाजी बकरे सरांची ‘ग्रॅव्हिटा’ ही अफलातून कलाकृती होय. एका बाटलीवर आडवी पट्टी ठेवून त्याला पुढे पट्टय़ा जोडून धनुष्यासारखे त्या बाटलीच्या मागेपर्यंत येणारे लाकडी शिल्प. हे सगळे शिल्प केंद्रीय गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार त्या बाटलीच्या तोंडावर तोलले गेलेले बघून डोळे विस्फारतात. कमालीची अचूकता यात साधलेली आहे.

सप्टेंबर 2014 मध्ये या कला महाविद्यालयाच्या कलासंग्रहातील चित्र आणि शिल्पकृतींचे भव्य प्रदर्शन जहांगीर कला दालन मुंबई इथे भरले होते. सन 2017 साली आर्ट स्कूलला पंचवीस वर्षे पूर्ण झाली. त्यावेळी देशभरातून 46 चित्रकार आणि शिल्पकार निमंत्रित केले होते. त्यावेळी लाईव्ह पोर्ट्रेट तसेच शिल्पे केली गेली. 70 पेक्षा जास्त पोर्ट्रेटस् असलेले भारतातले हे एकमेव कलाविद्यालय आहे. या कलादालनाच्या व्हरांडय़ामध्ये ठेवलेली शिल्पे अक्षरश जिवंत वाटतात. त्यातही पायात बूट घालणारा मुलगा हे शिल्प तर अफलातून आहे. प्रकाश राजेशिर्के सर कलाशिक्षण, कलादालन यासोबत वारसा संवर्धन यातसुद्धा जातीने लक्ष घालतात. कुठे गावाबाहेर विपन्नावस्थेत पडलेले वीरगळ, गद्धेगाळ त्यांनी तिथून आणून या आर्ट स्कूलच्या प्रांगणात आणून ठेवले आहेत. इथे येणाऱया मंडळींना त्याची माहिती आवर्जून देतात. सह्याद्री आर्ट स्कूलचे प्राचार्य प्रा. यादव सर हे स्वत कलाध्यापक असून विविध विषयांवर त्यांनी चित्रनिर्मिती केलेली आहे. हे सगळे कला महाविद्यालय उभे करण्यात कलामहर्षी प्रकाश राजेशिर्के सरांचे अपरिमित श्रम, त्यांनी खाल्लेल्या खस्ता आणि त्यांची कलेवर असलेली नितांत श्रद्धा कारणीभूत आहे.

हिरवा निसर्ग, संपन्न समुद्रकिनारा, विविध देवळे-राऊळे, लोककला यांच्यासोबत अशा समृद्ध कलादालनालासुद्धा भेट द्यायला हवी. या मातीतील कलाकारांनी साकारलेली चित्रकला, शिल्पकला आणि त्याचे मांडलेले देखणे प्रदर्शन आपल्या सहलीमध्ये समाविष्ट करायलाच हवे. आपण कलाकार असाल किंवा निव्वळ पर्यटनाच्या हेतूने भटकंती करत असाल तरीही अशा कलादालनांच्या भेटीने आपल्या पर्यटनाला एक वेगळा आयाम प्राप्त होईल यात शंका नाही.

Comments are closed.