खाजगी क्लासेसच्या मालमत्तांची चौकशी करून कारवाई करा

कोल्हापुरातील खासगी क्लासेस तथा अॅकॅडमी यांची आर्थिक व बेकायदेशीर मालमत्तांची चौकशी करून कारवाई करा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी विजय राठोड यांना निवेदन देण्यात आले.

‘नीट’ची परीक्षा रद्द होणे हे केंद्र सरकार आणि ‘एनटीए’चे मोठे अपयश आहे. या भोंगळ कारभाराचा फटका प्रामाणिक विद्यार्थ्यांना बसला आहे. देशातील कित्येक विद्यार्थ्यांनी अशा परिस्थितीमुळे आत्महत्या केल्याचे दिसून येत आहे. कोल्हापूर शहरातही अनेक ठिकाणी खासगी क्लासेस व अॅकॅडमी यांचे पेव उठले आहे. त्यांची नावे उघड करत, यांचे काही शिक्षण संस्थांशी असलेले मिलिभगत आणि आर्थिक व्यवहारांची तसेच बँक खात्यांची चौकशी झाली पाहिजे. तसेच पालकांनी क्लासेसना भरलेली फी ताबडतोब परत केली पाहिजे; अन्यथा ‘शिवसेना स्टाईल’ने ती वसूल करण्यात येईल, असा इशारा शिवसेनीकडून देण्यात आला आहे.

विनाअनुदानित व स्वयम् अर्थसहाय्य कनिष्ठ महाविद्यालयांना नव्याने परवानगी देऊ नये, कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करावी, खासगी क्लासेस व अॅकॅडमीसाठी नोंदणी बंधनकारक करून ही संरचना पारदर्शक करून शुल्काची अधिकृत पावती देणे सक्तीचे करावे, दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर बंदी घालावी, शासनाने जबाबदारी स्वीकारून कोल्हापूरसह महाराष्ट्रातील सर्व आरसीसी मोटेगावकर येथे शिकवणी घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची फी तत्काळ परत करावी, आदी मागण्या करण्यात आल्या.

कोल्हापूर शिवसेनेची मागणी

यावेळी उपनेते संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, मंजित माने, अवधूत साळोखे, रणजीत आयरेकर, युवराज खंडागळे, प्रसाद कुलकर्णी, राजू यादव, भीमराव पाटील, उदय सुतार, अक्षय घाटगे, दीपक गौड, दिलीप देसाई, अक्षय मोरे, शांताराम पाटील आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Comments are closed.