परीक्षण  – स्मृतींचा अमूल्य ठेवा

>> अनंत कराड

गतकाळातील बऱ्यावाईट स्मृतींबरोबरच मनामध्ये बालपणीच्या काही गोड आठवणीही फूलपाखरांप्रमाणे मुक्त बागडत असतात याची प्रत्येक संवेदनशील व्यक्तीला जाणीव होते आणि याच नेणिवेतील जाणिवा शब्दांत पकडण्यासाठी मनुष्याकडे कविमन असलं की, मग तो ठेवा समाजासाठी पुस्तक रूपानं प्रकट होतो. प्रभाकर साळेगावकरांनी त्यांच्या अशा आठवणींच्या रांगोळ्या ‘शिरगुळा’ या ललित लेखसंग्रहामध्ये इतक्या लयबद्धपणे चितारलेल्या आहेत की, वाचकाला आपलं स्वतःचं बालपण आठवू लागतं, नव्हे नव्हे तो त्या रांगोळ्या आपल्या रंगानं रंगवूही लागतो.

शिरगोळा हे गारगोटीच्या वर्गातील एक खनिज असून त्याच्यावर प्रहार केले असता शिरगोळ्याचे शंकरपाळ्याच्या आकाराचे मनमोहक स्फटिक तयार होतात. हेच स्फटिक वारंवार ठेचत, कुटत वा दळत राहिले की, त्याची पांढऱ्याशुभ्र रंगाची कणीदार रांगोळी तयार होते. प्रभाकरराव लहान असताना त्यांची आई घरातील रांगोळी संपली की, त्यांना माळावरून शिरगोळे आणण्यासाठी पाठवत असे. बहुतेक बालकांच्या आयुष्यात येणारा हा प्रसंग तसा साधाच दिसत असला तरी लेखकाने ज्या पद्धतीने तो शब्दबद्ध करून उभा केला आहे त्यातून त्यांचे वेगळेपण नक्कीच जाणवते.

माजलगावच्या सांस्कृतिक इतिहासातील स्वरसंगम मेळा असो की साळेगावातील लोकांच्या मनात उजेड पेरणारा खुटकंदील, गावाकडच्या रिभाऊंनी आणलेला ‘चुरमा’ लाडू असो की मामाच्या मुलाबरोबर मनसोक्त खेळलेला ‘चक्का’, बेसरमाचं  अबलूक दिसणारं ‘निळं निळं फुल’ असो की गरिबीमुळे कचऱ्यातील ढिगातून गोळा केलेल्या ब्राऊन पेपरची सुईदोऱ्यानं शिवलेली ‘माझी वही वेगळी’, साळेगावातील दुसरीपर्यंतचे शिक्षण घेतलेली शाळा असो की माजलगावातील पाचवी ते दहावीची शाळा या ‘प्रेरणेच्या शाळा’ आहेत हेही लेखकाने नम्रपणे नमूद केले आहे. या शाळेतील वर्गमित्र, शिक्षकवृंद या सर्वांकडून मिळालेले प्रेम ‘जांभळवढ्या’तील चैत्री उन्हातल्या थंडगार पाण्याप्रमाणे असायचं. वाचकाच्या अंतर्मनाला साद घालणाऱ्या प्रभाकररावांच्या या आठवणी अतिशय समृद्ध आहेत. भिक्षुकी म्हणून खळं मागण्याऐवजी शेतकऱ्याच्या वावरात तांबड्या ज्वारीचं बी एक तास पेरायला देणे आणि ते उगवून दाणे पक्व झाल्यानंतर ते पीक घरी घेऊन जाणे अशी एक प्रथा त्या काळी होती. त्याचाही उलगडा ‘तांबडीचं तास’ या लेखातून होतो. तर गावाकडील होलिकोत्सव अन् दुसऱ्या दिवशी साजरी होणारी धुळवड यांचे रसभरीत वर्णन ‘डोबी’ या लेखातून आलेले आहे.

पोळ्याच्या दिवशी कठाळ्याच्या टकरीत लहानग्या लेखकाला एका बैलानं शिंगावर घेऊन सुजान म्हातारीच्या घराच्या पायरीवर आपटल्यानं वरचा ओठ दुभंगला, पण फक्त ओली हळद लावल्यानंतर चार-सहा दिवसांत जखमेची खपली पडून तिथे फक्त एक खूण तयार झाली. त्यालाच ‘जन्मखूण’ म्हणतात असं सांगणारे वडील पाहिले की, वाचकातील बाप जागा होऊ लागतो. लेखकाची गुंजाच्या यात्रेतील मौजमजा वाचकाला आपसूकच आपल्या गावच्या जत्रेत घेऊन जाते.

लेकाला करडीचं तेल आवडतं म्हणून घरीच तेल तयार करत असताना करडीच्या आधनात शिजलेली पाल आढळताच आईच्या डोळ्याला धारा लागतात. कारण या आधनातील तेल देवाला ठेवल्यानंतर फक्त बंडूनेच खाल्ले होते, पण थोडक्यात खैर झाली नि बंडूला काही झालं नाही. मग हे तेल फेकून देण्याऐवजी बैलगाडीसाठी वापरल्या जाणाऱ्या तेलाच्या नळ्यात टाकण्याचे ठरले. ही सर्व कहाणी ‘सुगंधी झाला नळा’मध्ये वाचायला मिळते. सहनशील, विद्वान, सामाजिकता जपणारे वडील 2001 मध्ये संभाजीनगरला हेडगेवार दवाखान्यात दाखल झाल्यावर तेथेच त्यांचा अंत होतो. यानंतर प्रभाकरराव ‘बाप कळायला उशीर झाला’ असं प्रामाणिकपणे सांगतात.

भारतरत्न पं.भीमसेन जोशी यांच्या बाबतीतील दोन हृद्य आठवणी ‘स्वरभास्कराची दोन किरणे’ या लेखातून लेखक वाचकांसमोर ठेवतो. त्या नक्कीच अभिमानास्पद आहेत. ‘वादळ’ या काव्यसंग्रहाचं प्रकाशन ‘गोष्ट वादळ आल्याची’मध्ये साक्षात अनुभवता येतं. तर मामेभाऊ अनिल हृदयविकारानं गेल्यानंतर लेखकाच्या मनातील एक हळवा कोपरा ‘उत्तर दे ना प्लीज’ या लेखात दिसून येतो.

‘जेव्हा हातांनाही फुटतात हात’, ‘थकलेली सांजवेळ‘, ‘प्रार्थना.. साधना आणि साध्य’ व ‘मागे वळून पाताना’ हे लेखही वाचनीय आहेत. साळेगावकरांचा पिंड हा मूळचा कवीचा असल्याने या ललित लेखसंग्रहात वाचकांना काही गद्य तर काही पद्य लेख वाचायला मिळतात याचे आश्चर्य वाटायला नको. काही किरकोळ व्याकरणीय चुका वगळल्या तर हा ‘शिरगुळा’ नक्कीच वाचनीय आहे यात शंका नाही. कविता, हायकू, बालकविता, विडंबन, बालकथा या साहित्य प्रकारांतून मुक्त मुशाफिरी करणाऱ्या प्रभाकर साळेगावकर  यांनी निवडलेली ही वेगळी वाट कौतुकास्पद आहे.

शिरगुळा (ललित लेखसंग्रह)

लेखक: प्रभाकर साळेगावकर

प्रकाशन: आसावरी पब्लिकेशन, बीड

मुखपृष्ठ : विष्णू थोरे

पृष्ठे : 104

किंमत: 150 रु

Comments are closed.