चढ्ढा यांची राज्यसभेच्या समितीवर निवड
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
नुकतेच आम आदमी पक्षातून भारतीय जनता पक्षात आलेले राज्यसभा सदस्य राघव चढ्ढा यांची नियुक्ती राज्यसभेच्या ‘याचिका समिती’वर (पिटीशन कमिटी) अध्यक्ष म्हणून करण्यात आली आहे. राज्यसभेचे अध्यक्ष सी. पी. राधाकृष्णन यांनी शनिवारी या समितीची पुनर्रचना केली. नव्या समितीत राज्यसभेच्या 10 सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. राघव चढ्ढा हे या समितीचे अध्यक्ष राहणार आहेत.
या समितीत चढ्ढा यांच्यासह हर्ष महाजन, गुलाम अली, शंभू शरण पटेल, मयांककुमार नायक, मस्तानराव यादव, माथेर हाशम, सुभाशीश खुंटीया, आर. नारझरी आणि पी. संतोष कुमार हे सदस्य आहेत. या नव्या समितीच्या कार्याचा प्रारंभ 20 मे पासून झाला, असे मानण्यात येणार आहे. राज्यसभेच्या सचिवालयाकडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या एका सूचनेत ही माहिती देण्यात आली आहे. याचिका समिती ही राज्यसभेच्ााr एक महत्वाची समिती म्हणून ओळखली जाते. तिचे नेतृत्व करण्याची संधी आता राघव चढ्ढा यांना मिळणार आहे. राघव चढ्ढा यांनी आम आदमी पक्षाच्या 6 राज्यसभा खासदारांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्यामुळे राज्यसभेत या पक्षाची संख्या 113 पर्यंत पोहचली असून आम आदमी पक्षाची संख्या आता केवळ 3 इतकी उरली आहे.
Comments are closed.