आरोग्य – शरीराचा संरक्षक कफ दोष
>> डॉ. आशुतोष कुलकर्णी, [email protected]
शरीराला पोषण देण्याबरोबरच वात आणि पित्त दोष नियंत्रित ठेवणारा कफ दोष शरीरात संतुलित अवस्थेत असणे अत्यंत आवश्यक आहे.
भरपूर कफ झालाय डॉक्टर काहीतरी औषध द्या!’ सामान्य माणसाला कफ म्हणजे हेच माहिती, पण आयुर्वेदानुसार कफ दोष म्हणजे शरीराचा खरा संरक्षक. शरीराची ताकद आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविणणारा. सर्व घटक एकत्रित बांधून ठेवणारा. उदाहरण द्यायचे झाले तर गव्हाच्या पिठापासून जसे तेल, पाणी घातल्याशिवाय कणकेचा घट्ट गोळा होत नाही तसेच काहीसे काम कफ दोष आपल्या शरीरात करत असतो. कफ दोष हा ‘पृथ्वी’ आणि ‘जल’ या दोन महाभूतांपासून बनलेला आहे. त्यामुळे ‘पृथ्वी’मुळे कफ दोषात स्थिरता आणि जडपणा येतो, तर ‘जल’मुळे त्यात स्निग्धता आणि ओलसरपणा येतो. कफ शरीराला पोषण देण्याबरोबरच उर्वरित दोन दोष वात आणि पित्त नियंत्रित ठेवतो. कफ कमी झाल्यास हे दोन्ही दोष आपोआप वाढतात. त्यामुळे शरीरात कफ संतुलित अवस्थेत असणे अत्यंत आवश्यक आहे.
एखाद्या व्यक्तीची प्रकृती कफप्रधान आहे हे त्याची चाल खूप संथ आणि गंभीर, हळू गतीने काम, जड शरीर अशा अनेक लक्षणांवरून ओळखता येते. कफ प्रकृतीच्या लोकांचे शरीर मजबूत, मांसल आणि सुडौल असते. तसेच वीर्याची अधिकता हेही कफ प्रकृतीचे एक लक्षण आहे. जडपणामुळे कफ प्रकृतीच्या लोकांची चाल संथ असते. शीत गुणामुळे त्यांना भूक, तहान आणि उष्णता कमी जाणवते तसेच घामही कमी येतो. स्निग्धता आणि मृदुतेमुळे अशा लोकांची त्वचा गोरी आणि आकर्षक असते. कफ जड, थंड, स्निग्ध, गोड, स्थिर आणि चिकट असतो. हे त्याचे नैसर्गिक गुण आहेत. याशिवाय कफ संथ आणि ओलसर असतो. शरीरात कफ दोषाचे मुख्य स्थान पोट आणि छाती आहे. त्यामुळे छातीत कफ म्हणजे कफ दोष ही संकल्पना समाजात रूढ झाली असावी. परंतु कफ दोषाची कामानुसार विभागणी केली आहे जसे की, कफाचे पाच प्रकार आणि त्यांची कार्ये पुढीलप्रमाणे आहेत-
अवलंबक कफ ः याचे मुख्य स्थान छाती, हृदय आणि फुप्फुसे आहे. हा हृदय आणि श्वसनसंस्थेचे संरक्षण करणारे कवच म्हणून कार्य करतो. छातीला रचनात्मक आणि पोषणात्मक आधार देतो.तसेच रक्ताभिसरण आणि श्वसनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करतो.
दुसरा प्रकार क्लेदक कफ ः याचे मुख्य स्थान पोटाचा वरचा भाग आणि पचनसंस्था आहे. हा खाल्लेल्या अन्नाला ओलसर करून मऊ बनवतो आणि त्याचे विघटन करण्यास मदत करतो. पचनातील तीव्र आम्लांपासून जठराच्या आतील आवरणाचे संरक्षण करतो. तसेच पचनमार्गातील आर्द्रतेचे संतुलन राखतो.
तिसरा प्रकार तर्पक कफ ः याचे मुख्य स्थान डोके, मेंदू आणि सायनस भाग आहे. हा मेंदू, मज्जारस आणि मज्जासंस्थेला पोषण व स्निग्धता प्रदान करतो. डोळे, कान आणि नाक यांसारख्या ज्ञानेंद्रियांचे संरक्षण व आर्द्रता टिकवून ठेवतो. स्मरणशक्ती, मानसिक शांतता आणि भावनिक स्थैर्य राखण्यास मदत करतो.
चौथा प्रकार बोधक कफ ः याचे मुख्य स्थान तोंड, जीभ आणि लाळग्रंथी आहेत. हा तोंडातील द्रवांचे नियंत्रण करतो आणि चव ओळखण्यास मदत करतो. अन्नाला अंशत विरघळवून गिळणे सोपे करतो. तसेच लाळेद्वारे पचनक्रियेची सुरुवात घडवून आणतो.
पाचवा प्रकार श्लेषक कफ ः याचे मुख्य स्थान शरीरातील सर्व सांधे आहेत. हा सांध्यांमध्ये असणाऱया सायनोव्हियल द्रवासारखे कार्य करून हाडांच्या सांध्यांना स्निग्धता आणि स्थिरता प्रदान करतो. सतत होणारे घर्षण, झीज आणि संरचनात्मक नुकसान यांपासून सांध्यांचे संरक्षण करतो तसेच शरीराची हालचाल लवचिक, सुरळीत आणि वेदनारहित ठेवतो.
दही व श्रीखंडसारखे दुग्धजन्य अतिगोड पदार्थ खाणे, आंबट आणि तेलकट खाणे, अतिथंड पदार्थांचे सेवन, दिवसा झोपणे, आळशी स्वभाव आणि नियमित व्यायामाचा अभाव ही महत्त्वाची कारणे आहेत. सकाळच्या वेळी, जेवणानंतर आणि लहान मुलांमध्ये कफ नैसर्गिकरीत्या वाढलेला असतो.
कफ वाढल्यास सतत आळस आणि जास्त झोप येणे, शरीरात जडपणा जाणवणे, मल, मूत्र आणि घाम चिकट होणे, शरीरात ओलसरपणा जाणवणे, शरीरावर थर लागल्यासारखे वाटणे, डोळे आणि नाकातून अधिक स्त्राव होणे, अंगात शिथिलता येणे, श्वास घेण्यास त्रास आणि खोकला, नैराश्य ही लक्षणे दिसून येतात.
कफ संतुलित करण्याचे उपाय –
सर्वप्रथम कफ वाढण्याची कारणे दूर करणे आवश्यक आहे. कफ संतुलित ठेवण्यासाठी आहार आणि जीवनशैलीत योग्य बदल करणे गरजेचे आहे. कफ संतुलित राहण्यासाठी आहारात बाजरी, ज्वारी, नाचणी, मोहरी यांसारख्या धान्यांचे सेवन करा. पालक, कोबी, हिरवे बीन्स, ढोबळी मिरची, मटार, बटाटा, मुळा, बीट यांसारख्या भाज्या भरपूर खा. आहारात तूपाचे व तेलाचे प्रमाण कमी करा.
ताक सेवन करा. तिखट आणि गरम पदार्थ खा. सर्व प्रकारच्या डाळी व्यवस्थित शिजवून खा. आहारासोबत जीवनशैलीत बदल करणेही आवश्यक आहे. जलद चालणे, पोहणे यांसारखा व्यायाम करा. अतिचिंता करू नका. दैनंदिन दिनचर्येत बदल करा. अतिशय आरामदायी जीवनशैली टाळा आणि सतत सक्रिय राहा.
Comments are closed.