जस्सीचा वेग मंदावला! आयपीएल 2026 मध्ये बुमराहच्या संघर्षामागचे स्पष्टीकरण जयवर्धनेंनी दिले

आयपीएल २०२६ प्लेऑफच्या शर्यतीतून मुंबई इंडियन्स बाहेर झाला आहे, मात्र संघाचा शेवटचा लीग सामना रविवारी (२४ मे) राजस्थान रॉयल्स विरुद्ध आहे. वानखेडे स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत एमआयचे मुख्य प्रशिक्षक माहेला जयवर्धने यांनी काही गोष्टींचा खुलासा केला आहे. शनिवारी (२३ मे) झालेल्या पत्रकार परिषदेत जयवर्धने यांनी जसप्रीत बुमराहच्या निराशाजनक कामगिरीमागचे कारण सांगितले आहे.

वेगवान गोलंदाज बुमराह आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ खेळून एमआयमध्ये सामील झाला होता. त्याला विश्वचषकात दुखापत झाली होती, त्याचाच परिणाम त्याच्या आयपीएलमधील कामगिरीवर दिसला. त्याबद्दल जयवर्धने म्हणाले, “जागतिक स्पर्धेनंतर बुमराहला विश्रांतीसाठी पुरेसा वेळ मिळाला नाही, ज्यामुळे त्याची कामगिरी म्हणावी तशी झाली नाही.”

आयपीएलच्या या १९ व्या हंगामामधील बुमराहची कामगिरी पाहिली तर त्याने १३ सामन्यांमध्ये केवळ ४ विकेट्स घेतल्या आहेत. त्याच खराब फॉर्म हे फ्रॅंचायजीच्या निराशाजनक आयपीएल २०२६ मोहिमेमागील प्रमुख कारणांपैकी एक आहे. पाच वेळेचा विजेता संघ एमआयने या हंगामात १३ सामन्यांपैकी ४ सामने जिंकले आणि ९ सामने गमावले आहेत.

आयपीएल २०२६ च्या सुरूवातीच्या टप्प्यापासूननच बुमराह दुखापतीशी झुंजत होता. त्याबद्दल जयवर्धने म्हणाले, “हे काही गोष्टींच्या एकत्रित परिणामामुळे आहे. विश्वचषकातून परतल्यानंतर त्याला थोडी दुखापत झाली होती, त्यामुळे आम्ही त्याला पुनरागमन करण्यासाठी थोडी विश्रांती दिली होती.”

“पहिल्या ४-५ सामन्यांमध्ये त्याला झालेल्या किरकोळ दुखापतीतून सावरण्यासाठी त्याने हळूहळू तयारी केली. त्यामुळे त्याचा खेळाचा वेग मंदावला होता हे स्पष्ट दिसत होते आणि तो पुन्हा आता आपल्या मूळ लयीत परतला आहे. मागील ४-५ सामने चांगले झाले आहेत”, असेही जयवर्धने यांनी पुढे म्हटले आहे.

बुमराहसाठी हा हंगाम आव्हानात्मक राहिला आहे, जो टी२० विश्वचषकापूर्वी भारताने न्यूझीलंड संघाविरुद्ध खेळलेल्या पाच पैकी चार सामन्यांत तो खेळला होता. तसेच त्याने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली. होती. त्याने ४ षटकांत १५ धावा देत ४ विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. त्या स्पर्धेत तो वरुण चक्रवर्तीसोबत संयुक्तपणे सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला होता.

Comments are closed.