लडाखमध्ये चित्ता हेलिकॉप्टर कोसळले.

मेजर जनरल सचिन मेहता बचावले : तीन अधिकारी जखमी

वृत्तसंस्था/ लेह

लडाखमधील लेहजवळ तांगत्से परिसरात शनिवारी भारतीय लष्कराचे चीता हेलिकॉप्टर कोसळले. चीता हेलिकॉप्टरमधील मेजर जनरल यांच्यासह भारतीय लष्कराचे तीन अधिकारी गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात 20 मे रोजी झाला असून त्याची माहिती शनिवारी देण्यात आली. वृत्तानुसार, एक लेफ्टनंट कर्नल आणि एक मेजर हेलिकॉप्टर चालवत होते. तिसऱ्या इन्फंट्री डिव्हिजनचे जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल सचिन मेहता हे देखील चीता हेलिकॉप्टरमध्ये उपस्थित होते.

लेहजवळील डोंगराळ तांगत्से परिसरात भारतीय लष्कराचे चीता हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर तीन अधिकारी थोडक्यात बचावल्याचे सांगण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच, बचाव पथक तात्काळ रवाना करण्यात आले. बचाव पथकांनी घटनास्थळावरील सर्वांना वाचवले. भारतीय लष्कराच्या सर्व अधिकाऱ्यांना उपचारासाठी तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्व अधिकारी सध्या सामान्य स्थितीत असल्याचे वृत्त आहे.

अपघाताच्या कारणांची चौकशी सुरू

लष्करी अधिकारी सध्या अपघाताच्या कारणांची चौकशी करत आहेत. खराब हवामान आणि तांत्रिक बिघाड ही कारणे सांगितली जात असून, अपघाताची चौकशी सुरू आहे. तथापि, अपघाताच्या कारणाबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे, अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला होता की नाही हे निश्चित करणे कठीण आहे.

Comments are closed.