सावळा गोंधळ खपवून घेतला जाणार नाही, साताऱ्यात उदयनराजे-शिवेंद्रराजेंकडून नगरसेवकांची कानउघडणी

सातारा : सातारा नगरपालिकेतील नगरसेवकांची आज खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची आणि हायव्होल्टेज बैठक पार पडली. गेल्या काही दिवसांपासून पालिकेतील दोन्ही राजेंच्या गटातील नगरसेवकांमध्ये अंतर्गत वाद धुमसत होता. याच वादाची गंभीर दखल घेत आज दोन्ही राजेंनी नगरसेवकांची चांगलीच कानउघाडणी केली आहे. यावेळी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना खासदार उदयनराजे भोसले यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली. पालिकेच्या कामात कुठलाही सावळागोंधळ खपवून घेतला जाणार नाही, असा थेट इशारा यावेळी त्यांनी दिला.

उदयनराजे-शिवेंद्रराजे एकत्र

नगरसेवकांमध्ये समन्वय व्यवस्थिपणे साधला गेला पाहिजे.शहरातील जी विविध भागात, वॉर्डमध्ये, हद्दवाढ झाल्यानं आलेल्या भागातील कामं कशी मार्गी लावता येतील याबाबत बैठक होती.  जे नगरसेवक पहिल्यांदाच निवडून आले आहेत, त्यांना प्रशासकीय कामांचा अनुभव कमी आहे, त्यामुळे पालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांना योग्य मार्गदर्शन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत, असं उदयनराजे भोसले म्हणाले. यावेळी खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले नगरपालिका बैठकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र आलेले पाहायला मिळाले.

शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून कानपिचक्या

साताऱ्यातील राजकारण आणि क्रिकेटचा थरार एकाच मैदानात दोन दिवसांपूर्वी पाहायला मिळाला. साताऱ्यातील छत्रपती शाहू स्टेडियमवर मंत्री शिवेंद्रराजे भोसले क्रिकेट चषकाला दणक्यात सुरुवात झाली. यावेळी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी बॅट हातात घेत मैदानात जोरदार फटकेबाजी करत चौकार-षटकारांची आतषबाजी केली, तर दुसरीकडे आपल्या खास राजकीय शैलीत नगरसेवकांनाही कानपिचक्या दिल्या होत्या.

“खा. उदयनराजे आणि मी अंपायर… कोण कच्चा लिंबू, कोण आऊट आणि कोण नॉट आऊट ते आम्हीच ठरवतो,” असे मिश्किल वक्तव्य करत त्यांनी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकवला. सातारा नगरपालिकेच्या नगरसेवकांच्या टीम तयार करुन त्यांच्या मॅचेस आयोजित कराव्यात असंही शिवेंद्रराजे भोसले म्हणाले होते.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सातारा नगरपालिकेच्या सभेत शिवेंद्रराजे भोसले यांचे समर्थक असलेल्या नगरसेवक बाळासाहेब खंदारे यांनी उदयनराजे भोसले यांचे समर्थक आणि उपनगराध्यक्ष असलेल्या दत्तात्रय बनकर यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांना मानणाऱ्या नगरसेवकांच्या स्वतंत्र बैठका अनुक्रमे जलमंदिर आणि सुरुची येथे झाल्या होत्या. मात्र, दोन्ही नेत्यांनी नगरसेवकांना तुम्ही भाजपचे नगरसेवक असून आता नगरविकास आघाडी आणि सातारा विकास आघाडी असा विषय नसल्याचं सांगितलं होतं.

सातारा नगरपालिकेच्या सभेत झालेल्या वादानंतर उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांची मुंबईत देखील भेट झाली होती. या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी आज साताऱ्यात नगरसेवकांची संयुक्त बैठक घेतली.

आणखी वाचा

Comments are closed.