पुढील काही तासांत चांगली बातमी येऊ शकते, इराण करारावर मार्को रुबियो यांचे वक्तव्य

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या चर्चेसंदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी संकेत दिला आहे की, येत्या काही तासांत इराणबाबत एक अतिशय महत्त्वाची आणि चांगली बातमी येऊ शकते. टीव्ही९ भारतवर्षने या संदर्भात वृत्त दिले आहे.

मार्को रुबियो सध्या हिंदुस्थानच्या ४ दिवसीय दौऱ्यावर आहेत. हिंदुस्थानचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासोबत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना रुबियो यांनी म्हटले की, “गेल्या ४८ तासांत इराणसोबतच्या चर्चेत लक्षणीय प्रगती झाली असून, होर्मुझ सामुद्रधुनीच्या समस्येवर लवकरच तोडगा निघू शकतो.”

रुबियो यांचे हे विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रतिक्रियेनंतर आले आहे. ट्रम्प यांनी आपल्या ट्रुथ सोशल अकाउंटवर माहिती देताना सांगितले होते की, वॉशिंग्टन आणि तेहरान एका ऐतिहासिक करारावर शिक्कामोर्तब करण्याच्या अगदी जवळ आहेत. दोन्ही देशांमधील युद्ध संपवणे आणि होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली करणे याबाबतची चर्चा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या कराराच्या अंतिम मुद्द्यांवर सध्या चर्चा सुरू असून लवकरच याची अधिकृत घोषणा होऊ शकते,

न्यूयॉर्क टाइम्सच्या एका वृत्तानुसार, इराणने आपल्याकडील समृद्ध युरेनियमचा साठा सोडण्याची तयारी तत्त्वतः दर्शवली असल्याचा दावा करण्यात आला होता. पुढील ३० ते ६० दिवसांत यावर सविस्तर चर्चा होणार असल्याचे अमेरिकन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटले होते.

मात्र एका वरिष्ठ इराणी अधिकाऱ्याने रॉयटर्स वृत्तसंस्थेशी बोलताना हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, सध्या तयार होत असलेल्या प्राथमिक करारामध्ये अण्वस्त्रांचा मुद्दा समाविष्ट नाही आणि इराणने आपले युरेनियम देशाबाहेर पाठवण्यास कोणतीही सहमती दिलेली नाही.

Comments are closed.