Ratnagiri News – पुर्णगडात अणुऊर्जा प्रकल्प होऊच द्यायचा नाही, पहिल्याच बैठकीत पुर्णगड-मेर्वी पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा निर्धार

रत्नागिरी तालुक्यातील पुर्णगड येथील ग्रामस्थांच्या माथी अणुउर्जा प्रकल्प मारण्याचा प्रयत्न केंद्र आणि राज्य सरकार करत आहे. त्याविरोधात पुर्णगड आणि मेर्वी पंचक्रोशीतील ग्रामस्थ एकवटले आहेत. पुर्णगडमध्ये अणुऊर्जा प्रकल्प होऊच द्यायचा नाही, असा निर्धार करत ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

केंद्र सरकारने अदानी ग्रुप आणि रिलायन्स ग्रुप सोबत सामंजस्य करार केला आहे.त्यामध्ये बारसू, पुर्णगड आणि देवगडमध्ये अणुउर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. पुर्णगडमध्ये रिलायन्स ग्रुपचा अणुउर्जा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी मिळाल्यानंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पुर्णगड आणि मेर्वी पंचक्रोशीतील ग्रामस्थांची एक महत्वपूर्ण बैठक झाली. याबैठकीत गावात येणारा अणुउर्जा प्रकल्प हा विषय चर्चेला ठेवण्यात आला. यावेळी सर्वच ग्रामस्थांनी विनाशकारी अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध केला.कोणत्याही परिस्थितीत सर्व गावकऱ्यांनी एकत्र येत गावावर आलेले हे विनाशकारी अणुऊर्जा प्रकल्पाचे संकट परतवून लावण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला. आज पूर्णगड आणि मेर्वी पंचक्रोशीत आंबा-काजू,भात आणि अन्य पीकांचे उत्पादन घेतले जाते. त्याचबरोबर मच्छीमारी हा यापरिसरातील ग्रामस्थांचा व्यवसाय आहे. अणुऊर्जा प्रकल्प आल्यास शेती,बागायती आणि मच्छीमारी उध्वस्त होणार आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी अणुऊर्जा प्रकल्पाला तीव्र विरोध करण्याची तयारी बैठकीत केली.

सभेत किरण तोडणकर, शशिकांत महाडये, ओंकार अभ्यंकर, संतोष कुरतडकर, मंगेश महाडये, विनोद साळुंखे, अभिजीत डोंगरे, विजयकुमार शिंदे, अमृत पोकडे, अन्वर पेढे, तयब दरवेश, सुहासिनी धनबा, नम्रता बिर्जे, रामचंद्र भाबरे, अमृतराज भाऊकर आदी उपस्थित होते.

पंचक्रोशीतील ग्रामस्थ एकत्र येऊन बैठक झाली. यावेळी अणुऊर्जा प्रकल्पाच्या बाबतीत काय भूमिका घ्यायची याविषयावर जेव्हा चर्चा झाली तेव्हा सर्वांनीच प्रकल्पाला विरोध करायचा असा एकमुखाने निर्णय घेतला. – किरण तोडणकर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विभागप्रमुख, पावस

Comments are closed.