IPL 2026 – मोहम्मद शमीचा घातक मारा अन् सलामीवीरांची उडतीये भंबेरी, नवा विक्रम प्रस्थापित

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिंदुस्थानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने IPL 2026 मध्ये एक नवा ऐतिहासिक कीर्तिमान आपल्या नावावर केला आहे. पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात 198 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करायला उतरलेल्या पंजाबच्या संघाला शमीने पहिल्याच चेंडूवर मोठा धक्का दिला. त्याने सलामीवीर प्रियांश आर्यला अर्जुन तेंडुलकरकरवी झेलबाद केले. आयपीएलच्या इतिहासात डावाच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेण्याची शमीची ही तब्बल सहावी वेळ ठरली आहे. यासह त्याने जोफ्रा आर्चरला (5 विकेट्स) मागे टाकत आयपीएलमध्ये इतिहास रचला आहे. आयपीएलच्या इतिहासात पहिल्याच चेंडूवर सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम मोहम्मद शमीच्या नावावर आहे. या यादीत ट्रेंट बोल्ट (3 विकेट्स) तिसऱ्या क्रमांकावर आहे.

मोहम्मद शमीसाठी यंदाचा IPL 2026 चा हंगाम तसा चढ-उतारांचा राहिला आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 13 सामन्यांत 12 विकेट्स घेतल्या आहेत. मात्र, जेव्हा-जेव्हा डावातील पहिले ओव्हर टाकण्याची जबाबदारी त्याच्यावर आली, तेव्हा त्याने अप्रतिम गोलंदाजी केली. या हंगामात 13 वेळा डावाची पहिली ओव्हर टाकताना शमीने केवळ 7.23 च्या इकॉनॉमी रेटने धावा दिल्या आणि महत्त्वाच्या 5 विकेट्स देखील घेत विरोधी संघाला अडचणीत आणले.

IPL 2026 – अनकॅप्ड खेळाडूंमधला बादशहा! प्रभसिमरन सिंहची बॅट तळपली आणि इतिहास घडला, अशी कामगिरी करणारा पहिलाच

दरम्यान, आयपीएलमध्ये मोहम्मद शमीचा दबदबा पाहायला मिळाला असला, तरी संपूर्ण टी-20 क्रिकेटचा विचार केला तर हा जागतिक विक्रम पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदी आणि इंग्लंडच्या ल्यूक वूड यांच्या नावावर आहे. या दोन्ही गोलंदाजांनी टी-20 क्रिकेटमध्ये डावाच्या पहिल्याच चेंडूवर प्रत्येकी 9-9 वेळा विकेट्स घेण्याचा अद्भूत पराक्रम केला आहे. त्यांच्या या विक्रमाच्या दिशेने आता मोहम्मद शमीने आयपीएलमधील आपल्या घातक गोलंदाजीच्या जोरावर वेगाने पावले टाकली आहेत.

Comments are closed.