Ratnagiri News – दापोलीत निसर्गाचा कोप नसतानाही 18 तास बत्ती गुल! महावितरणच्या कारभारावर नागरिकांचा तीव्र संताप
कोणतीही वादळ-वाऱ्याची किंवा आपत्तीजनक परिस्थिती नसतानाही दापोली शहर आणि तालुक्यात तब्बल 18 तासांपेक्षा अधिक काळ वीज पुरवठा खंडित राहिल्याने महावितरणच्या भोंगळ कारभाराचे धिंडवडे निघाले आहेत. शनिवारी रात्री 10 वाजता अचानक गायब झालेली वीज थेट रविवारी सायंकाळी 4 वाजेपर्यंत गायबच होती. त्यामुळे दापोलीकरांना संपूर्ण रात्र अंधारात आणि उकाड्यात चाचपडत काढावी लागली, तर रविवारी सुट्टीच्या दिवशी नागरिकांच्या दैनंदिन कामांचा पार बोजवारा उडाला.
शनिवारी (२३ मे) रात्री दापोलीत अजिबात वारा नव्हता की पावसाचे वातावरण. तरीही अचानक वीज खंडित झाल्यामुळे घरात पंखे, कुलर बंद पडून नागरिकांना अक्षरशः नरकयातना सहन कराव्या लागल्या. त्यातच विकेंड निमित्त दापोलीतील केळशी ते दाभोळ दरम्यानच्या समुद्रकिनाऱ्यांवरील हॉटेल्स, रिसॉर्ट्स, एमटीडीसी मान्यताप्राप्त होम स्टे आणि खानावळींमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. पर्यटकांनी आगाऊ रकमा देऊन ‘एसी रूम्स’ बुक केल्या होत्या, मात्र वीज नसल्याने त्यांना ही सुविधा मिळू शकली नाही. यामुळे रात्री पर्यटकांची झोपमोड झाली आणि रिसॉर्ट चालकांसोबत पर्यटकांचे खटके उडाले. परिणामी, दापोलीच्या मुख्य आर्थिक कणा असलेल्या पर्यटन व्यवसायाला याचा मोठा फटका बसला.
विजेअभावी सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना पूर्णपणे ठप्प झाल्या. घरगुती आणि व्यावसायिक ग्राहकांना पंपाद्वारे विहिरी किंवा विंधण विहिरींमधून पाणी उपसा करता आला नाही, ज्यामुळे संपूर्ण तालुक्यात पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले होते. सुट्टीच्या दिवशी करायची दळणाची कामे खोळंबली. तसेच आईस्क्रीम पार्लर, शीतपेय विक्रेते, दूध व दुग्धजन्य पदार्थांचे व्यावसायिक आणि मोबाईल चार्जिंगसारख्या छोट्या-मोठ्या गरजांसाठी नागरिक पूर्णपणे हवालदिल झाले होते.
या अभूतपूर्व वीज संकटामुळे ग्राहकांकडून महावितरणवर प्रश्नांचा भडीमार होत आहे. बेजबाबदार अधिकारी की निष्क्रिय कर्मचारी? तांत्रिक बिघाड की देखभालीचा बोजवारा? अपुरी यंत्रणा की वाढलेला ताण? असे प्रश्न नागरिकांनी उपस्थित केले आहेत. नागरिकांच्या मते, महावितरणकडे वारंवार तक्रार करूनही ट्रान्सफॉर्मरवरील वाढलेला ताण, जळालेले फ्युज, जीर्ण वीजतारा, लोंबकळणाऱ्या केबल्स आणि झाडांच्या फांद्या छाटणे या गंभीर बाबींकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली जात आहे. त्यातच महावितरणच्या हेल्पलाईनवर फोन केल्यास प्रतिसाद मिळत नाही आणि स्थानिक कार्यालयातून कोणतीही ठोस माहिती दिली जात नाही. नियमित वीजबिल भरूनही ‘शून्य सेवा’ मिळत असल्याने व्यापारी वर्गही संतप्त आहे. फ्रिज, कोल्ड स्टोरेज, संगणक आणि इंटरनेट सेवा ठप्प झाल्याने मोठे आर्थिक नुकसान होत आहे, तर व्होल्टेजच्या चढ-उतारामुळे घरगुती उपकरणे जळत असून महावितरण यावर मौन बाळगून आहे.
“पूर्वी किरकोळ बिघाड तातडीने दुरुस्त होत होते; मात्र आता लहान समस्यांसाठीही तासनतास वीज गायब राहते. ही बाब अत्यंत गंभीर आहे. महावितरणने आता वेगवेगळ्या सबबी सांगणे थांबवून तातडीने कामाला लागावे. अन्यथा अंधारातून निर्माण झालेला हा जनतेचा संताप लवकरच तीव्र आंदोलनात परिवर्तित होईल.” ऋषिकेश गुजर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुकाप्रमुख, दापोली
Comments are closed.