मुंबईच्या विजयानंतर असं असणार केकेआरचं प्लेऑफसाठीचं समीकरण, वाचा सविस्तर
आयपीएल २०२६ स्पर्धेत रविवारी साखळी फेरीतील शेवटचा सामना रंगणार आहे. पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. तर दुसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा सामना दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये होणार आहे. आतापर्यंत ३ संघांनी प्लेऑफमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. तर चौथ्या स्थानासाठी राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या ३ संघांमध्ये चुरशीची लढत सुरु आहे. दरम्यान पहिल्या सामन्यात जर राजस्थान रॉयल्सचा पराभव झाला, तर पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्ससाठी कसं असेल समीकरण? जाणून घ्या.
मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणाऱ्या सामन्याने चौथा संघ कोणता असेल, हे स्पष्ट होणार आहे. जर राजस्थान रॉयल्सने हा सामना जिंकला, तर राजस्थान रॉयल्सचा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा चौथा संघ ठरेल. पण जर राजस्थानचा पराभव झाला, तर पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्ससाठी प्लेऑफचा मार्ग मोकळा होणार आहे.
राजस्थानच्या पराभवानंतरही कोलकाता नाईट रायडर्ससाठी प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग मुळीच सोपा नसणार आहे. कारण कोलकाता नाईट रायडर्सला जर प्लेऑफमध्ये प्रवेश करायचा असेल, तर नेट रनरेट बरोबरीत आणण्यासाठी १८० धावांचं आव्हान १२ ते १२.४ षटकात पूर्ण करावं लागणार आहे. तर धावांचा बचाव करताना कोलकाता नाईट रायडर्सला हा सामना ७७ धावांनी जिंकावा लागणार आहे. जर असं झालं नाही, तर मग पंजाब किंग्सचा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा चौथा संघ ठरेल.
आयपीएल २०२६ स्पर्धेतील क्वालिफायर १ मध्ये जाणारे दोन्ही संघ ठरले आहेत. गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ १८ गुणांसह गुणतालिकेत आहे. तर गुजरात टायटन्सचा संघ देखील १८ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. या दोन्ही संघांमध्ये क्वालिफायर १ चा सामना रंगणार आहे. जो संघ हा सामना जिंकेल, तो थेट अंतिम फेरीत प्रवेश करणार आहे. तर पराभूत होणाऱ्या संघाला अंतिम फेरीत जाण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. सनरायझर्स हैदराबादचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे.
Comments are closed.