लाडकी बहीण योजना शासनानं राबवली त्याच्यामुळं खूप ताण पडलाय, उदयनराजे भोसले यांचं मोठं वक्तव्य

सातारा : साताऱ्याचे लोकसभा खासदार उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सातारा नगरपालिकेच्या नगरसेवकांची बैठक घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांकडून सातारा नगरपालिकेच्या नगरसेवकांना पालिकेच्या कामात कुठलाही सावळागोंधळ खपवून घेतला जाणार नाही, असा थेट इशारा दोन्ही नेत्यांकडून देण्यात आला. यावेळी बोलताना उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात एक वक्तव्य केलं आहे.  लाडकी बहीण योजना शासनानं राबवली त्यामुळं ताण खूप पडला आहे. फंडिंग जितकं यायला पाहिजे तितकं येत नाही. नियोजन करुन मार्ग कसा काढता येईल त्यासाठी ही बैठक घेतल्याचं उदयनराजे भोसले म्हणाले.

उदयनराजे भोसले लाडकी बहीण योजनेबाबत काय म्हणाले?

आजची बैठक बोलावण्याचं कारण एवढंच होतं, की कोऑर्डिनेशन व्यवस्थित झालं पाहिजे. शहरातील विविध भागात, वॉर्डात , प्रभागात आणि हद्दवाढीतून आलेल्या भागात कामं कशी मार्गी लावता येईल यासाठी ही बैठक होती. चांगल्या प्रकारे बैठक पार पडली. प्रशासन सुद्धा सूचना देण्यात आल्या की नवीन म्हणजेच पहिल्यांदा विजयी झालेले नगरसेवक आहेत त्यांना मुख्याधिकारी किंवा विभागप्रमुखांनी सहकार्य केलं पाहिजे, मार्गदर्शन केलं पाहिजे, असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं.

हेवेदावे काही नव्हते, दुसऱ्या सूचना केल्या की अतिक्रमण होऊ नये. वेगवेगळ्या ठिकाणी जागा आहेत तिथं हॉकर्स झोन करावेत, ज्यामुळं ट्रॅफिकला अडचणी निर्माण होणार नाहीत, अशा सूचना शिवेंद्रराजे आणि मी दिल्याचं उदयनराजे भोसले म्हणाले. युद्धामुळं अगोदरच महागाई वाढलेली, प्रत्येकाच्या मनात कुटुंबाची उपजीविका कशी मार्गी लावायची अशी विवंचना असते, त्यासंदर्भात बैठक घेतलेली, असं उदयनराजे भोसले यांनी सांगितलं.

पहिल्यांदा कोणत्याही बैठकीपूर्वी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनी सगळ्यांच्या बरोबर बसून त्यांचा ज्या काही सूचना असतील, प्रत्येकाला वाद असं काही नसतो.माझा एक वॉर्ड आहे, शिवेंद्रराजेंचा शेजारी वॉर्ड असतो.मला वाटतं की माझ्या वॉर्डमध्ये काम व्हावं, हेच जर अगोदर ठरलं तर वाद असायचं कारण काय, असंही उदयनराजे भोसले यांनी म्हटलं.

प्रत्येकाला असं वाटणं स्वाभाविक आहे की ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिलं, ज्यांनी मतदान केलं, त्यांच्या नगरसेवकांकडून, आमदार म्हणून शिवेंद्रराजेंकडून, खासदार म्हणून माझ्याकडून, प्रत्येक लोकप्रतिनिधीकडून लोकांच्या अपेक्षा असतात की आमची कामं मार्गी लागली पाहिजेत, याकरता आम्ही तुम्हाला निवडून दिलं, असं उदयनराजे भोसले म्हणाले.

आता जी काय लाडकी बहीण योजना शासनानं राबवली त्याच्यामुळं कसं झालं ताण खूप पडला आणि फंडिंग वेगवेगळ्या ठिकाणी जेवढं यायला पाहिजे तितकं येत नाही.त्यामुळं त्याचं नियोजन व्यवस्थित करुन काय करता येईल, कसा मार्ग काढता येईल, त्यासाठी ही मीटिंग घेतलेली, असं उदयनराजे भोसले म्हणाले.

आणखी वाचा

Comments are closed.