IPL 2026 – राजस्थानची प्लेऑफमध्ये ‘रॉयल’ धडक; मुंबईचा धुव्वा उडवला, पंजाब आणि KKR चे आव्हान संपुष्टात
राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्समध्ये झालेल्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा 30 धावांनी पराभव करत प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सची सुरुवात निराशाजनक झाली आणि अवघ्या 33 धावांवर त्यांचे दोन्ही सलामीवीर बाद झाले. मात्र, ध्रुव जुरेलच्या 38 धावांच्या संयमी खेळीने डाव सावरला आणि खालच्या फळीत जोफ्रा आर्चरने केलेल्या 32 धावांच्या फटकेबाजीमुळे राजस्थानने निर्धारित 20 षटकांत 8 बाद 205 धावांचा डोंगर उभा केला. मुंबईकडून दीपक चाहर आणि शार्दुल ठाकूरने प्रत्येकी 2 बळी घेतले.
राजस्थानने दिलेल्या 206 धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सचा 175 धावांपर्यंतच मजल मारू शकला. राजस्थानच्या अचूक गोलंदाजी आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासमोर मुंबईच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही. या विजयासह राजस्थान रॉयल्स 16 गुणांसह प्लेऑफमध्ये पोहोचणारा चौथा संघ ठरला आहे. राजस्थानच्या या धडाकेबाज विजयामुळे प्लेऑफच्या शर्यतीत असलेल्या पंजाब किंग्स आणि कोलकाता नाइट राइडर्स या दोन्ही संघांचे आयपीएल 2026 मधील आव्हान आता अधिकृतपणे संपुष्टात आले आहे. यापूर्वीच रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांनी अंतिम-4 मध्ये आपले स्थान पक्के केले आहे.
आयपीएलच्या इतिहासात राजस्थान रॉयल्सने प्लेऑफमध्ये पोहोचण्याची ही सातवी वेळ आहे. विशेष म्हणजे, अष्टपैलू खेळाडू रियान पराग याच्यासाठी हा क्षण अत्यंत ऐतिहासिक ठरला आहे. कारण कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच हंगामात त्याने राजस्थानला प्लेऑफचे तिकीट मिळवून दिले आहे. आयपीएल इतिहासात सर्वाधिक 12 वेळा प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा विक्रम चेन्नई सुपर किंग्सच्या नावावर आहे. दुसरीकडे, मुंबई इंडियन्ससाठी हा हंगाम अत्यंत निराशाजनक ठरला असून, ते आधीच स्पर्धेतून बाहेर पडले होते आणि या पराभवाने त्यांच्या खराब कामगिरीची सांगता झाली.
Comments are closed.