आता, कला क्षेत्रातही बिनविरोध निवडणुकांची प्रवृत्ती घुसतेय; यशोमती ठाकूरांचे कलाकारांना आवाहन
मुंबई : राज्यात विधानपरिषदेची निवडणूक जाहीर झाली असून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 17 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी बिनविरोध उमेदवार विजयी झाले होते. त्यानंतर, आता सोलापूरची निवडणूक (Election) बिनविरोध करावी, असे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी म्हटलंय. एकीकडे ही निवडणूक बिनविरोधची तयारी सुरू असतानाच दुसरीकडे तब्बल 10 वर्षांनी होऊ घातलेली अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची निवडणूक देखील बिनविरोध करण्याचा घाट घालण्यात येत आहे. अभिनेते विजय पाटकर यांनी याबाबत गंभीर आरोप करत सत्ताधारी मंत्र्यांच्या ओएसडींचा हस्तक्षेप असल्याचे म्हटले. त्यानंतर, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर (Yashomati thakur) यांनी ट्विट करत हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक असल्याचे म्हटले.
चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली असून अभिनेते विजय पाटकर विरुद्ध मेघराज भोसले अशी लढत दिसून येणार असल्याची सर्वत्र चर्चा होती. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत अभिनेते विजय पाटकर यांनी 2014 ते 2016 या काळात अध्यक्षपद भूषवले होते. त्यानंतरच्या निवडणुकांमध्ये त्यांना विरोधी पॅनेल्सकडून पराभवाचा सामना करावा लागला. यावेळची मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक सुरू आहे. या निवडणुकीत मी उमेदवारी अर्ज भरून कोल्हापूरला पाठवला होता. मात्र, राजकारण करून काही लोकांनी माझा उमेदवारी अर्ज भरू दिला नाही, अशी खंत अभिनेते विजय पाटकर यांनी व्यक्त केली आहे. त्यावरुन, यशोमती ठाकूर यांनी तीव्र भावना व्यक्त करत कलाकरांना आवाहनही केलंय.
मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीसाठी ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांना उमेदवारी अर्ज भरण्यापासून रोखण्यात आल्याचा प्रकार अत्यंत गंभीर आहे. एका मंत्र्याचा OSD कोल्हापुरात बसून ही निवडणूक मॅनेज करत आहे. साम, दाम, दंड, भेद वापरून बिनविरोध निवडणुका करणे ही अत्यंत घातक प्रवृत्ती हल्ली वाढली आहे, असे म्हणत काँग्रेस नेत्या तथा माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीवर भाष्य केलं.
विजय पाटकरांसांठी यशोमती ठाकूरांचे आवाहन
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तर बिनविरोध निवडणुका करण्याचा कहरच सत्ताधाऱ्यांनी केला होता. आता, कला क्षेत्रात जर ही प्रवृत्ती घुसत आहे, तर संविधानिक लोकशासाठी हे अत्यंत घातक आहे. अभिनेते विजय पाटकर यांनी आवाज उठवला आहे, मराठी कलाकार, कलाप्रेमी आणि मराठी प्रेमींनी देखील यावर आवाज उठवला पाहिजे, असेही यशोमती ठाकूर यांनी म्हटलं.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.