इराणसोबतचे आमचे संबंध व्यावसायिक होत आहेत, मात्र नाकाबंदी कायम – डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी इराणसोबतच्या कराराबाबत मोठी घोषणा केली आहे. जोपर्यंत एखाद्या करारावर एकमत होऊन स्वाक्षरी होत नाही, तोपर्यंत इराणवरील नाकाबंदी पूर्णपणे लागू राहील, असे ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर पोस्ट करत म्हटले आहे. दोन्ही बाजूंनी वेळ घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा, यात कोणतीही चूक होता कामा नये, असेही त्यांनी म्हटले आहे. टीव्ही९ भारतवर्षने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
वाटाघाटी योग्य आणि चांगल्या मार्गाने सुरू असून, कोणत्याही करारासाठी घाई करू नये, अशा सूचना आपण आपल्या प्रतिनिधींना दिल्या असल्याचे ट्रम्प म्हणाले. इराणसोबतचे आमचे संबंध आता अधिक व्यावसायिक आणि फलदायी होत आहेत. मात्र त्यांनी हे समजून घेतले पाहिजे की, ते अण्वस्त्रे किंवा बॉम्ब बनवू किंवा खरेदी करू शकत नाहीत, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.
यावेळी मध्यपूर्वेतील सर्व देशांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल ट्रम्प यांनी त्यांचे आभार मानले. ऐतिहासिक अब्राहम अकॉर्ड्समध्ये देशांचा सहभाग वाढल्याने हे संबंध अधिक मजबूत होतील आणि कदाचित इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणलाही यात सामील व्हायला आवडेल, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे, याआधी ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल अकाऊंटवर ‘Adios’ अशी कॅप्शन असलेली एक AI जनरेटेड इमेज पोस्ट केली होती. ज्यामध्ये अमेरिकन ड्रोनद्वारे इराणी नौदलाचे जहाज नष्ट केले जात असल्याचे दाखवण्यात आले होते.
दुसरीकडे, इराणने म्हटले आहे की, ते राजनैतिक चर्चेसाठी तयार आहेत. परंतु प्रत्येक वेळी प्रस्ताव आणि संदेशांची देवाणघेवाण होत असताना अमेरिका नवीन आणि अतिरेकी मागण्या करत आहे व आपले म्हणणे बदलत आहे. सध्या अमेरिका मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग (MoU) मधील काही मुद्दे लीक करत असल्याचा आरोप इराणने केला आहे. होर्मुझची सामुद्रधुनी, युद्ध कसे संपवायचे, इराणची गोठवलेली मालमत्ता आणि त्यांच्या अण्वस्त्र कार्यक्रमाबाबत जे बोलले जात आहे, त्यापेक्षा लीक झालेली माहिती पूर्णपणे वेगळी असल्याचे इराणचे म्हणणे आहे.
Comments are closed.