Sindhudurg News – मिठमुंबरी बागवाडी समुद्रात मुंबईचे चार पर्यटक बुडाले; तिघांना वाचवण्यात यश, एक बेपत्ता

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

देवगड तालुक्यातील मिठमुंबरी बागवाडी समुद्रात पर्यटनासाठी आलेले चार तरूण बुडाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. स्थानिक मच्छिमार आणि ग्रामस्थांच्या प्रसंगावधनामुळे तिघांना वाचवण्यात यश आले. एक जण बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे. चैतन्य राजेंद्र गुरव (22) असे बेपत्ता तरुणाचे नाव आहे. एकाची प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्याच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. त्याची प्रकृती सुधारत असल्याची माहिती मिळते.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील पाच मित्र देवगड येथे पर्यटनासाठी आले होते. सर्वजण मिठमुंबरी समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेले होते. यावेळी चौघेजण समुद्रात पोहण्यासाठी उतरले असता अचानक खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केल्यानंतर समुद्रकिनाऱ्यावर उपस्थित असलेल्या स्थानिक नागरिक व मच्छीमार बांधवांनी तात्काळ धाव घेतली.

स्थानिक मच्छिमारांनी तीन होड्यांच्या सहाय्याने समुद्रात उतरून बचावकार्य सुरू केले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे तिघा युवकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. मात्र, चैतन्य गुरव हा तरुण समुद्रात बेपत्ता झाला असून त्याचा शोध सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने समुद्रकिनारी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

दरम्यान, घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रविण सावंत, पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद आचरेकर तसेच मत्स्यव्यवसाय सुरक्षा रक्षक इंद्रजित येरम यांनी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. बेपत्ता तरुणाचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.

Comments are closed.