अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; पाटकरांवर भोसलेंचा पलटवार
मुंबई : एकीकडे विधानपरिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच दुसरीकडे चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. अभिनेते विजय पाटकर विरुद्ध मेघराज भोसले अशी लढत दिसून येणार असल्याची सर्वत्र चर्चा होती. मात्र, यावेळी चित्रपट महामंडळाची निवडणूक सुरू असताना मला निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरू दिला नसल्याचं विजय पाटकर यांनी म्हटलं आहे. मी कोल्हापूरला अर्ज पाठवला होता. पण, राजकारण करून काही लोकांनी माझा उमेदवारी अर्ज भरू दिला नाही, असे विजय पाटकर यांनी म्हटले होते. त्यावरुन, यशोमती ठाकूर यांनी तीव्र भावना व्यक्त करत कलाकरांना बिनविरोध निवडणूक (Election) न करण्याचं आवाहनही केलंय. आता, या आरोपावर विरोधी उमेदवार मेघराज भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
विजय पाटकर यांनी माझ्यावर आज अनेक आरोप लावले, अभिनेता म्हणून हा माणूस चांगला आहे, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा आहे हे त्यांनी आज दाखवून दिलं, असे म्हणत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष मेघराज भोसले यांनी विजय पाटकर यांच्या आरोपावर स्पष्टीकरण देत पलटवार केला. तसेच, पाटकर यांना निवडणुकीत फॉर्म भरायला कोणी अडवलं होत? पण कोणत्या तरी मंत्र्याचा ओएसडीचा दबाव होता हे खोट बोलण काही योग्य नाही, असेही मेघराज भोसले यांनी म्हटलं. सगळ्यांनी एकत्र येऊन ही निवडणूक लढवली पाहिजे असं मी त्यांना सांगितलं आणि कॉल केला होता. पण त्या गोष्टीला त्यांनी चुकीचं समजलं आणि मी निवडणुकीला घाबरलो आहे, असं त्यांना वाटल. पण, मी गेली 5 वर्ष अध्यक्ष असताना जेवढी कामं झाली आहेत, तेवढी कामं गेल्या 55 वर्षात चित्रपट महामंडळात झाली नाहीत. विजय पाटकर हे महामंडळाचे अध्यक्ष असताना त्यांनी फक्त पिक्चर मिळवले, त्यापलीकडे जाऊन त्यांनी काही काम केलं नाही. आता, माझ्यावर ते खोटे नाटे आरोप लावत आहेत, असा गंभीर आरोपही मेघराज भोसले यांनी केला आहे.
विजय पाटकरांवरच भ्रष्टाचाराचे आरोप
विजय पाटकरांना हे शोभत नाही, माझ्यावर कोणत्या भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाले आहेत हे त्यांनी दाखवून द्यावे. याउलट त्यांच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप झाले, त्यामुळेच त्यांना पदावरून पायउतार व्हावं लागलं, असेही भोसले यांनी म्हटलं. दरम्यान, अभिनेते विजय पाटकर यांनी 2014 ते 2016 या काळात अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्षपद भूषवले होते. त्यानंतरच्या निवडणुकांमध्ये त्यांना विरोधी पॅनेल्सकडून पराभवाचा सामना करावा लागला.
यशोमती ठाकूर यांच्याकडून संताप
मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीसाठी ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांना उमेदवारी अर्ज भरण्यापासून रोखण्यात आल्याचा प्रकार अत्यंत गंभीर आहे. एका मंत्र्याचा OSD कोल्हापुरात बसून ही निवडणूक मॅनेज करत आहे. साम, दाम, दंड, भेद वापरून बिनविरोध निवडणुका करणे ही अत्यंत घातक प्रवृत्ती हल्ली वाढली आहे, असे म्हणत काँग्रेस नेत्या तथा माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीवर भाष्य केलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तर बिनविरोध निवडणुका करण्याचा कहरच सत्ताधाऱ्यांनी केला होता. आता, कला क्षेत्रात जर ही प्रवृत्ती घुसत आहे, तर संविधानिक लोकशासाठी हे अत्यंत घातक आहे. अभिनेते विजय पाटकर यांनी आवाज उठवला आहे, मराठी कलाकार, कलाप्रेमी आणि मराठी प्रेमींनी देखील यावर आवाज उठवला पाहिजे, असेही यशोमती ठाकूर यांनी म्हटलं.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.