डॉक्टर सुट्टीवर, रुग्ण गॅसवर; तरुणाच्या पायाचे ऑपरेशन चार वेळा रद्द, उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयातील संतापजनक प्रकार
उद्या तुमचे ऑपरेशन आहे. आज उपाशी राहावे लागेल, असे सांगण्यात आल्यानंतर ऑपरेशनच्या दिवशी मात्र डॉक्टरच गायब होत असल्याने एका तरुणाच्या पायाचे ऑपरेशन गेल्या महिनाभरापासून लटकले आहे. ही संतापजनक घटना उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात घडली आहे. वेदना असह्य होत आहेत. माझे ऑपरेशन कधी करणार, असा सवाल या तरुणाने केला आहे.
राजकुमार पासी हा तरुण पायाच्या ऑपरेशनसाठी उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात गेल्या महिनाभरापूर्वी दाखल झाला. ज्यादिवशी ऑपरेशन ठरले त्याच्या आदल्या दिवशी राजकुमारला पूर्ण दिवस उपाशी ठेवण्यात आले. ऑ परेशनच्या दिवशी मात्र डॉक्टरांनी सुट्टी घेतली आहे. आज ऑपरेशन होणार नाही, असे त्याला सांगण्यात आले. एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर तब्बल चार वेळा अशा प्रकारे डॉक्टर सुट्टीवर गेल्यामुळे राजकुमार पासी याची मानसिक आणि शारीरिक फरफट सुरू आहे. तारीख पे तारीख मिळत असल्याने पायाचे ऑपरेशन कधी होणार, असा आर्त सवाल राजकुमारने विचारला आहे.
गंभीर रुग्णांना कळवा रुग्णालयाचा रस्ता
काही गंभीर किंवा तातडीच्या उपचारासाठी रुग्ण दाखल झाले की त्यांना थेट कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचा रस्ता दाखवला जातो. त्यामुळे उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वैद्यकीय अधिकारी गायब, तर डॉक्टर सुट्टीवर यामुळे रुग्णांनी करायचे काय, असा संतप्त सवाल नातेवाईकांनी विचारला आहे
Comments are closed.