एकही चेंडू न खेळता राजस्थान रॉयल्स जाऊ शकतो आयपीएलमधून बाहेर? समजून घ्या IPLचा सर्वात खतरनाक नि
SRH vs RR एलिमिनेटर IPL 2026 : आयपीएल 2026 आता अत्यंत रोमांचक टप्प्यावर पोहोचला असून 27 मे रोजी मुल्लानपूरच्या महाराजा यादवेंद्र सिंह इंटरनॅशनल स्टेडियम येथे सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात ‘करो या मरो’ एलिमिनेटर सामना रंगणार आहे. सायंकाळी 7:30 वाजता सुरू होणाऱ्या या लढतीत विजयी संघ थेट क्वालिफायर-2 मध्ये धडक मारून फायनलचे स्वप्न जिवंत ठेवेल, तर पराभूत संघाचा आयपीएल 2026 मधील प्रवास कायमचा संपुष्टात येईल.
एलिमिनेटर पावसामुळे रद्द झाला तर काय होणार? (SRH vs RR Eliminator IPL 2026)
या हायव्होल्टेज सामन्यावर पावसाचे सावट असल्याने चाहत्यांची धडधड वाढली आहे. जर मुसळधार पाऊस किंवा इतर कोणत्याही कारणामुळे सामना पूर्णपणे रद्द झाला आणि एकही चेंडू टाकला गेला नाही, तर या सामन्यासाठी कोणताही ‘रिझर्व्ह डे’ ठेवलेला नाही. अशा परिस्थितीत सामना अनिर्णित घोषित केला जाईल.
आयपीएलच्या अधिकृत नियमांनुसार, लीग स्टेजमध्ये गुणतालिकेत वरच्या स्थानावर असलेल्या संघाला थेट फायदा मिळतो. सनरायझर्स हैदराबादने लीग फेरीत तिसरे स्थान मिळवले होते, तर राजस्थान रॉयल्स चौथ्या क्रमांकावर राहिली होती. त्यामुळे सामना रद्द झाल्यास सनरायझर्स हैदराबाद थेट क्वालिफायर-2 मध्ये प्रवेश करेल आणि राजस्थान रॉयल्सचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल.
सामना निकालासाठी किमान किती षटके आवश्यक? (SRH vs RR Eliminator IPL 2026)
एलिमिनेटर सामन्याचा निकाल लागण्यासाठी दोन्ही संघांनी किमान 5-5 षटकांचा खेळ होणे आवश्यक आहे. अशा मोठ्या सामन्यांत पंचांची पहिली प्राथमिकता निकाल लावण्याचीच असते. जर दोन्ही संघांनी किमान 5 षटके खेळली, तर डकवर्थ-लुईस नियमानुसार विजेता निश्चित केला जाईल. मात्र, 5 षटकांपूर्वीच सामना थांबला आणि पुढे खेळ शक्य झाला नाही, तर सामना रद्द मानला जाईल आणि त्याचा थेट फायदा सनरायझर्स हैदराबादला होईल.
कोणाचा पलडा जड?
सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएलमध्ये आतापर्यंत 23 सामने झाले आहेत. त्यापैकी सनरायझर्स हैदराबादने 14 विजय मिळवले आहेत, तर राजस्थान रॉयल्सला फक्त 9 सामने जिंकता आले आहेत. विशेष म्हणजे, यंदाच्या हंगामात दोन्ही संघांमध्ये झालेल्या दोन्ही सामन्यांत सनरायझर्स हैदराबादनेच बाजी मारली आहे. त्यामुळे आकडेवारीनुसार हैदराबादचा पलडा जड दिसत असला, तरी राजस्थान रॉयल्सला कमी लेखणे धोकादायक ठरू शकते. रोमांच, दबाव आणि प्लेऑफचा ताण… या सगळ्यात कोण बाजी मारणार, याकडे आता संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.