महिनाभरातच संसाराचं स्वप्न भंगलं, नवदाम्पत्याने विहिरीत उडी घेत जीवन संपवलं

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

लग्नानंतर अवघ्या एका महिन्यातच नवविवाहित दाम्पत्याने सोमवारी रात्री विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना यवतमाळच्या मारेगाव तालुक्यातील सगणापूर येथे घडली. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली. करिश्मा धानोरकर आणि आशिष धानोरकर अशी मयत दाम्पत्याची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.

मिळालेल्या माहितीनुसार, करिश्मा व आशीष धानोरकर यांचा विवाह 4 मे 2026 रोजी मोठ्या उत्साहात पार पडला होता. नव्या संसाराची स्वप्ने रंगवत असलेल्या या दाम्पत्याने असे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही.

दोघेही सोमवारी रात्री सुमारे साडेआठ वाजताच्या सुमारास मोटारसायकलवरून घराबाहेर पडले. मात्र बराच वेळ उलटूनही ते परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. शोधमोहीम सुरू असतानाच गावालगतच्या शेतातील विहिरीत दोघांचे मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.

प्राथमिक तपासात दोघांनीही आपल्या पोटाला दोरीने दगड बांधून विहिरीत उडी घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही आत्महत्या असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलिस ठाण्याचे ठाणेदार शाम वानखेडे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.

या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिसांकडून कौटुंबिक, सामाजिक आणि इतर बाजूंनी तपास सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणाबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले. सखोल तपासानंतरच घटनेमागील कारण स्पष्ट होणार असल्याचे सांगितले आहे.

Comments are closed.