तेलाच्या बाटलीवरील चिकट थर काढण्यासाठी सोपे घरगुती उपाय

स्वच्छ किचन म्हणजे केवळ चमकदार भांडी नव्हे, तर रोज वापरल्या जाणाऱ्या वस्तूंची योग्य निगा देखील. स्वयंपाकघरात तेलाची बाटली ही अशी वस्तू आहे जी दिवसातून अनेकदा हाताळली जाते. मात्र सततच्या वापरामुळे तिच्या बाहेरील भागावर आणि झाकणाभोवती तेलाचा चिकट थर साचत जातो. यामुळे बाटली केवळ अस्वच्छ दिसत नाही, तर हाताला चिकटपणा जाणवतो आणि किचनची स्वच्छताही कमी झाल्यासारखी वाटते. काही सोपे घरगुती उपाय वापरून हा त्रास सहज दूर करता येऊ शकतो.

१) तांदळाचे पीठ
बाटलीवर जाड तेलकट थर जमा झाला असेल तर तांदळाचे पीठ उपयुक्त ठरते. तेल शोषून घेण्याची क्षमता असल्याने ते चिकटपणा कमी करण्यात मदत करते. बाटलीवर थोडे तांदळाचे पीठ लावा आणि काही मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर कोरड्या कपड्याने हलक्या हाताने घासून स्वच्छ करा. शेवटी ओलसर कपड्याने पुसल्यास बाटली पुन्हा स्वच्छ दिसू लागते.

2) बेबी पावडर
घरातील बेबी पावडर केवळ त्वचेसाठीच नाही तर स्वच्छतेसाठीही उपयोगी ठरू शकते. तेलकट भागावर थोडी पावडर लावून दोन ते तीन मिनिटे ठेवावी. पावडर तेल शोषून घेतल्यानंतर मायक्रोफायबर कपड्याने बाटली पुसावी. यामुळे पृष्ठभागावरील चिकट थर सहज निघून जातो.

3) झाकणाची स्वच्छता
अनेकदा तेलाचा सर्वाधिक साठा बाटलीच्या झाकणामध्ये आणि त्याच्या आतील भागात जमा होतो. कोमट पाण्यात थोडासा व्हिनेगर मिसळून झाकण दहा मिनिटे भिजत ठेवा. नंतर जुन्या टूथब्रशच्या मदतीने स्वच्छ केल्यास आत अडकलेली चिकट घाणही निघून जाते.

4) लिंबाची साल
स्वच्छता झाल्यानंतर बाटलीवर लिंबाची साल हलक्या हाताने चोळा. यामुळे तेलकट वास कमी होतो आणि बाटलीला ताजेतवानेपणा मिळतो. नैसर्गिक स्वच्छतेसाठी हा उपाय अनेक घरांमध्ये प्रभावी मानला जातो.

तेलाची बाटली स्वच्छ ठेवण्यासाठी या सवयी लावा
– प्रत्येक वापरानंतर बाटलीचा तोंडाचा भाग स्वच्छ पुसा.
– आठवड्यातून किमान एकदा बाटली बाहेरून स्वच्छ करा.
– तेलाची बाटली गॅसजवळ ठेवणे टाळा, कारण उष्णतेमुळे चिकटपणा अधिक वाढू शकतो.
– बाटलीखाली छोटी ट्रे ठेवा, त्यामुळे गळणारे तेल एका ठिकाणी जमा होईल.
– झाकण नियमितपणे काढून स्वच्छ करण्याची सवय लावा.

Comments are closed.