केडीएमसीच्या शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार, दहावीच्या 60 विद्यार्थ्यांची गुणपत्रिका, लिव्हिंग सर्टिफिकेट दिलेच नाही; 11 वीचे प्रवेश लटकलेला
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचा भोंगळ आणि अनागोंदी कारभार समोर आला आहे. नेतिवली येथील मराठी माध्यमाच्या शाळेतील नववी आणि दहावीचे वर्ग अचानक बंद करण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यातच दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या 60 विद्यार्थ्यांना अद्याप गुणपत्रिका आणि लिव्हिंग सर्टिफिकेट दिले नसल्याने अकरावीचे प्रवेश लटकले आहेत. आवश्यक कागदपत्रे न मिळाल्यामुळे 11 वीचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याचे टेन्शन मुलांसह पालकांना आहे.
नेतिवली परिसरातील शाळा क्रमांक 19 मधून या वर्षी दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी गुणपत्रिका आणि शाळा सोडल्याचा दाखला मिळण्यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. मात्र शिक्षक आणि प्रशासनाकडून कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे हवालदिल झालेल्या पालकांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी शहरप्रमुख सचिन बासरे आणि सुरेश तेलावणे यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. यानंतर संतप्त पालक, विद्यार्थी आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने थेट केडीएमसीचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांची भेट घेत शिक्षण विभागाच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
शिवसेनेच्या दणक्यानंतर प्रशासन ताळ्यावर आले. उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी शिक्षण विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ आपल्या दालनात बोलावून घेतले. तसेच शाळेतील नववी आणि दहावीचे वर्ग बंद होणार नसल्याचे स्पष्ट करत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही असे सांगितले. याशिवाय दहावी उत्तीर्ण झालेल्या सर्व 60 विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रिका आणि शाळा सोडल्याचा दाखला तत्काळ उपलब्ध करून देण्याचे कडक आदेशही त्यांनी दिले.
शिक्षण अधिकाऱ्याचा मनमानी कारभार
नेतिवली परिसरात प्रबोधनकार ठाकरे विद्यालय ही नववी आणि दहावीचे वर्ग असलेली एकमेव पालिका यांच्या मनमानी कारभारामुळे शाळेचे भवितव्य धोक्यात आले आहे. शाळेचे आणि विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेचे माजी शहरप्रमुख सचिन बासरे यांनी पालिका आयुक्तांना दिला आहे.
साहेब, आम्ही उत्तर भारतीय तरीही आमची मुले मराठी शाळेत
पालिकेतील बैठकीत एका उत्तर भारतीय महिलेने व्यक्त केलेल्या भावना उपस्थितांचे लक्ष वेधून घेणाऱ्या ठरल्या. त्या हात जोडून म्हणाल्या, साहेब आम्ही मूळचे उत्तर प्रदेशचे असलो तरी आमच्या मुलांना जाणीवपूर्वक मराठी माध्यमात शिक्षण देत आहोत. माझ्यासारख्या अनेक कुटुंबांची मुले या शाळेत शिकत आहेत. एकीकडे मराठी भाषा आणि मराठी शाळांचे संवर्धन करण्याच्या घोषणा केल्या जातात तर दुसरीकडे पालिका प्रशासन मराठी शाळांचे वर्ग बंद करत आहे. कृपया आमच्या मुलांचे भविष्य उद्ध्वस्त करू नका, अशी विनंती या माऊलीने करताच अधिकारीही निरुत्तर झाले.
Comments are closed.