रोहित-हार्दिकबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर, BCCI चा अफगाणिस्तान विरुद्धच्या मालिकेसाठी दोघांना हिरवा कंदील!

भारतीय संघ अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी सामन्यानंतर तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेत स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि अनुभवी फलंदाज रोहित शर्मा खेळणार की नाही याची अनिश्चितता होती. आता त्यांच्या फिटनेसबदद्ल महत्त्वाची माहिती समोर येत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सेंटर ऑफ एक्सलेंसच्या (सीओई) क्रीडा पथकाने रोहित आणि हार्दिकला अफगाणिस्तान विरुद्धच्या वनडे मालिकेत खेळण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे दोघे संघनिवडीसाठी उपलब्ध असणार आहेत.

दुखापतींमुळे दोघे आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सच्या अनेक सामन्यांना मुकले होते. हार्दिकला पाठीच्या स्नायूंच्या दुखापतीचा त्रास होता, तर रोहित हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे बेजार होता. हार्दिक २ जूनपासून बंगळुरूच्या सीओईमध्ये आहे. बीसीसीआयच्या एका सूत्रानुसार, हार्दिक २ जूनपासून सीओईमध्ये हजर होण्याआधी परदेशात सुट्टीवर होता. पुढील पाच दिवसांत त्याने विविध सराव केला आणि १० षटके गोलंदाजीही केली. त्याला कोणतीही अडचण आली नसून तेथिल स्ट्रेंथ ऍंड कंडिशनिंग प्रशिक्षकाने त्याला फिट घोषित केले.

रोहितही सीईओमध्ये होता आणि त्यालाही चाचणीनंतर वनडे मालिकेत खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे. सोमवारी (८ जून) भारताचे सहाय्यक प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी सांगितले होते की, जरी त्यांच्याकडे पंड्याच्या फिटनेसबद्दल कोणतीही सद्य माहिती नसली तरी, त्यांना तो ठिक वाटत होता.

भारत विरुद्ध अफगाणिस्तान वनडे मालिका येत्या १३ जूनपासून सुरू होत आहे. पहिला सामना धरमशालेत खेळला जाणार आहे. दुसरा सामना १७ जूनला लखनऊमध्ये आणि तिसरा सामना २० जूनला चेन्नईमध्ये खेळला जाणार आहे.

तसेच या वनडे मालिकेतून भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. त्याला आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यावेळी ही दुखापत झाली होती. त्याने त्या सामन्यात नाबाद ७५ धावा करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सलग दुसऱ्या विजेतेपदात महत्त्वाची भुमिका बजावली होती. त्याच्याजागी यशस्वी जायस्वालची निवड करण्यात आली आहे.

Comments are closed.