12 चेंडू 10 धावांची गरज; या खेळाडूने श्रीलंकेकडून खेचून आणला विजय! भारताचा थरारक विजय

भारताचा अ संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. भारत अ, श्रीलंका अ आणि अफगाणिस्तान अ या तिन्ही संघांमध्ये तिरंगी मालिकेचा थरार सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना भारत अ आणि श्रीलंका अ या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात श्रीलंकेकडे एकहाती विजय मिळवण्याची संधी होती, पण अर्शद खानने ४९ व्या षटकात गोलंदाजीला येऊन सामना फिरवला. २७८ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेचा डाव २६९ धावांवर आटोपला. यासह भारतीय संघाने हा सामना ८ धावांनी आपल्या नावावर केला आहे.

या सामन्यात भारतीय संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. पण भारतीय संघाला हवी तशी सुरुवात करता आली नव्हती. सलामीला आलेला प्रभसिमरन सिंग अवघ्या २ धावा करत माघारी परतला. तर वैभव सूर्यवंशी अवघ्या १४ धावांवर बाद झाला. प्रियांश आर्यने ३२ धावांची खेळी केली. ऋतुराज गायकवाड या सामन्यात चमकला. ऋतुराजने १०१ धावांची खेळी केली. त्याला साथ देत तिलक वर्माने ६० धावांची खेळी केली. शेवटी आयुष बदोनीने २४ धावा केल्या,तर सूर्यांश शेडगेने २६ धावा करत संघाची धावसंख्या २७७ धावांवर पोहोचवली.

या सामन्यात श्रीलंकेला चांगली सुरुवात मिळाली होती. त्यामुळे श्रीलंकेचा संघ हा सामना एकहाती जिंकणार असं वाटलं होतं. पण शेवटी भारतीय गोलंदाजांनी दमदार पुनरागमन केलं. ४९ व्या षटकात अर्शद खानने सामना श्रीलंकेकडून खेचून आणला. श्रीलंकेला १२ चेंडूत अवघ्या १० धावांची गरज होती. त्यामुळे श्रीलंकेच्या दिशेने झुकतं माप होतं, पण अर्शद खानने सामना फिरवला. या षटकातील दुसऱ्या चेंडूवर अर्शदने वियासकांथला अवघ्या ५ धावांवर पायचित करुन माघारी धाडलं. त्यानंतर पुढच्या चेंडूवर मोहम्मद शिराजला झेलबाद करण्याची संधी निर्माण झाली होती. पण अर्शद खानकडून झेल सुटला. त्यानंतर ऋतुराज गायकवाडने वानुजा सहनला नॉन स्ट्राईकला धावबाद करत श्रीलंकेला लागोपाठ दुसरा धक्का दिला.

इथून श्रीलंकेला विजयासाठी ९ चेंडूत अवघ्या ९ धावांची गरज होती. तर भारतीय संघाला विजय मिळवण्यासाठी १ विकेटची गरज होती. या षटकातील पाचव्या चेंडूवर अर्शद खानने मोहम्मद शिराजला झेलबाद केलं आणि श्रीलंकेचा डाव २६९ धावांवर आटोपला. यासह श्रीलंकेचा संघ विजयापासून अवघ्या ८ धावा दूर राहिला. श्रीलंकेकडून फलंदाजी करताना साहन अराच्चिगेने सर्वाधिक ७४ धावांची खेळी केली. तर सदीरा समराविक्रमाने ४६ आणि अविष्का फर्नांडोने ४५ धावांचे योगदान दिले.

Comments are closed.